जलयुक्‍त शिवार ‘नाव मोठं लक्षण खोटं’


ढेबेवाडी : मोठा गाजावाजा केलेल्या आणि मुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट ठरलेली जलयुक्त शिवार योजना आणि त्यासाठी सातारा जिल्ह्यासाठी ठरवून दिलेले निकष पाहता या योजनेसाठी कमीत कमी खर्च कसा होईल याचा विचार करूनच योजनेचे निकष ठरविले आहेत की काय असा प्रश्‍न पडतो. या योजनेबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट विंग, घारेवाडी, बामणवाडी, कुसूर आदी विविध गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची याबाबत मते जाणून घेण्यात आली. त्यानुसार जलयुक्त शिवार योजनेत आपल्या गावचा समावेश व्हावा म्हणून अनेक गावातील लोक प्रतिनिधींनी अक्षरशः जीवाचे रान करून संबधीत अधिकार्‍यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले. योजनेत समावेश झाल्यावर कृतकृत्य झालो अशी भावनाही त्यांची झाली. 2017/18 या आर्थिक वर्षात कराड तालुक्यातील 21 गावांचा जलयुक्त मध्ये समावेश झाला.विविध विभागामार्फत सर्व्हे झाले. स्थानिक नेते मंडळी व ग्रामस्थांनी सव्हेत सहभाग घेतला. खर्चाची अंदाजपत्रके तयार झाली आणि मंजुरीही मिळाली असे सांगण्यात आले पण नेमकी किती हे कळालेच नाही.

जानेवारी 2018 नंतर कामे सुरू झाली मात्र कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. तक्रारी वाढल्या म्हणून पं.स.सभापती दालनात बैठक झाली. लोकप्रतिनिधींनी मंजूर कामांचा आढावा घेतला आणि वस्तुस्थिती समोर आली तेंव्हा लक्षात आले की जलयुक्त शिवार म्हणजे जनतेची शुद्ध फसवणूक आहे.

कराड तालुक्यातील 21 गावांचा यामध्ये समावेश झाला. विंग सारख्या आठ हजार लोक संख्येच्या व विस्तारित व तिन्ही बाजुनी डोंगरांनी वेढलेल्या गावाचाही यामध्ये समावेश झाला. माती नाला बंधारे,सिमेंट नाला बंधारे व अन्य 25 वर कामे आहेत. त्याची तीन ते साडेतीन कोटी रूपयांची अंदाजपत्रके तयार झाली होती. मात्र शासनाच्या निकषाने दणका दिल्याने फक्त 14 लाख 54 हजार रूपये खर्चाची किरकोळ कामे म्हणजे जुने को.प. बंधारे, पाझर तलाव, ग्राम तलाव दुरूस्ती अशा कामांनाच मंजुरी मिळाली. नविन कामे धरलेलीच नाहीत. मग शिवार जलयुक्त होणार कसा ?असा विंगकरांचा सवाल आहे.

गेली चार वर्षे टंचाईचा सामना करणार्‍या टँकरग्रस्त बामणवाडी गावाचीही अशीच अवस्था झाली आहे. फक्त दुरूस्तीच्या तीन व अन्य किरकोळ दोन कामासाठी 25 लाख 56 हजार एवढाच निधी मंजूर आहे.आता या गावात जलसाठा होणार कुठे व कसा? आणि जमिनीतली पाणी पातळी वाढणार कशी? असे अनेक प्रश्‍न सरपंच व उपसरपंचांनी व्यक्त केले आहेेत. गाजावाजा झालेली जलयुक्त म्हणजे नाव मोठ आणि लक्षण खोटं असा प्रकार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.