Your Own Digital Platform

साताऱ्यात अतिक्रमण विभागाची कारवाई


सातारा : राजवाडा बस स्थानक ते मंगळवार तळे या मार्गावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी दुपारी कारवाई करून तीन केळीच्या गाड्या जप्त केल्या. पप्पू बागवानं दस्तगीर कॉलनी सातारा याच्यावर कारवाई झाल्याने भर रस्त्यात केळीची फेकाफेकी करून अतिक्रमण निरीक्षकांशी हुज्जत घालण्याचा प्रकार घडला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राजवाड्यावर अचानक झालेल्या गोंधळामुळे वाहतुकीची कोंडी झाली. शहर विकास विभागाचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम शैलेश अष्टेकर आणि त्यांच्या आठ कर्मचाऱ्यांच्या पथकाची सातारा शहरातठिकठिकाणी कारवाई सुरू आहे.

जिल्हा परिषद कॉर्नर, अनंत इंग्लिश स्कूल मार्ग येथील टपऱ्या हटवल्यानंतर मंगळवार तळे रस्त्यावर मंगळवारी अतिक्रमण हटाव विभागाने तळ दिला. राजवाडा बस स्थानक ते मंगळवार तळे रस्ता 2007 पासून नो हॉकर्स झोन आहे. तरीही राजवाडा बस स्थानकाच्या कोपऱ्यावर फळांच्या गाड्या आणि वडापची गर्दी यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. अतिक्रमण हटाव पथकाने केळीच्या आठ गाड्यांवर कारवाई करत तीन हातगाड्या आणि त्यावरील मालं जप्त केला. पप्पू दस्तगीर नावाच्या विक्रेत्याने कारवाईचा राग आल्याने केळीची फेकाफेकी करत शैलेश अष्टेकर यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. 

पालिका कर्मचारी व फळ विक्रेते यांच्यात कारवाई वरून रस्त्यावरचं वादावादी सुरू झाली. या कारवाईला पोलीस बंदोबस्त नसल्याने विक्रेत्यांना चेव चढला. मालाच्या फेकाफेकीने राजवाड्यावर काही काळ गोंधळाचे वातावरण होते. मात्र अतिक्रमण हटाव पथक बधले नाही.त्यांनी तीन गाडया जप्त केल्या आणि शासकीय कामात अडथळा आणणाऱ्याच्या विरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात थेट तक्रार दिली. रात्री उशिरापर्यंत तक्रार घेण्याचे काम सुरू होते.