Your Own Digital Platform

'माउली' परतीच्या वाटेवरफलटण: आषाढीवारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे गेलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळ्याचे परतीच्या वाटेवर मंगळवार दि. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी फलटण शहरात आगमन झाले सोहळा येथील नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिरात 1 दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला त्यावेळी समाज आरती नंतर फलटण शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.

आळंदी ते पंढरपूर या आषाढीवारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा प्रतीवर्षी फलटण मार्गे पंढरपूरकडे जात असताना येथील विमानतळावरील प्रशस्त पालखी तळावर विसावतो त्यावेळीही फलटण व पंचक्रोशीतील भाविक माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात त्यावेळी फलटण पंचायत समिती, फलटण नगर परिषद अन्य संस्था तसेच शासन यंत्रणा आणि फलटणकर सोहळ्यातील वारकरी भाविकांची सर्वतोपरी सोय करण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यातून कोणाचीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी प्रत्येक घटक घेत असतो.
आळंदी ते पंढरपूर हा 21 दिवसांचा प्रवास असून 280 कि.मी. अंतर पार करुन सोहळा आषाढी एकादशीला पंढरपूर तिर्थक्षेत्री दाखल होतो त्यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालख्या पंढरपूर शहरात दाखल होतात त्यावेळी सुमारे 10/12 लाखाहून अधिक वारकरी, भाविक, भक्त त्यामध्ये सहभागी असतात.
आषाढी एकादशीनंतर पौर्णिमेला माऊलींचा सोहळा परतीच्या मार्गावर मार्गस्थ झाला प्रतीवर्षी चतुर्थीला सोहळा येथील बारामती चौकातील शिंपीसमाज विठ्ठल मंदिरात विसावतो यावर्षीही सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर फलटण शहर व परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी येथे अक्षरश: रांगा लावल्या होत्या. मंदिराच्या दक्षीण व पूर्व बाजूकडील दोन्ही दरवाजातून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्रपणे रांगा लावण्यात आल्या होत्या. पोलीस यंत्रणेने सर्वांना सुलभपणे दर्शन व्हावे यासाठी बारामती चौक आणि उघडा मारुती मंदिरासमोर बॅरिगेट्स लावून दर्शनबारीची व्यवस्था केली होती. भाविक मंदिराबाहेर उभ्या असलेल्या माऊलींच्या रथाचे आणि मंदिरात जावुन माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेत होते या सोहळ्यासमवेत सुमारे 3 हजार मानकरी, सेवेकरी आणि वारकरी आहेत. सोहळ्यासमवेत पाण्याचे टँकर्स आणि सामानासाठी 2 ट्रक त्याचप्रमाणे रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे.
सोहळ्याच्या येथील वास्तव्यादरम्यान उघडा मारुती मंदिर व परिसरात विविध खेळणी, खाद्यपदार्थ, संसारोपयोगी साहित्याचे तसेच पूजेसाठी हार, फुले व अन्य पूजा साहित्याचे स्टॉलही येथे लावण्यात आले आहेत.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता. त्याचप्रमाणे शिंपीसमाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय उंडाळे, सुभाष भांबुरे व त्यांच्या सहकार्‍यांनीही सोहळ्याच्या येथील वास्तव्यादरम्यान प्रतीवर्षाप्रमाणे सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.