Your Own Digital Platform

व्हॉटसअप ग्रुप माध्यमातून लाखाची मदत


म्हसवड /हिंगणी : पानवणमधील वॉट्सअप ग्रुपने अनोखा उपक्रम राबवून आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पै. अमोल नरळेस एक लाखाची मदत केली.सोशल मीडियाच्या अती आणि चुकीच्या वापरामुळे सोशल मीडियाचे नाव बदनाम झाले असले तरी अनेक उपयुक्त गोष्टीही या माध्यमातून साध्य करता येतात, हे पानवणमधील युवकांनी दाखवून दिले आहे. पानवणमधील युवा कुस्तीपटू पैलवान अमोल शंकर नरळे यास नोमाद आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सुमारे 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य पानवणमधील युवकांनी वॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मिळवून दिले. युवकांच्या या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पानवणमधील युवा कुस्तीपटू पैलवान अमोल नरळे हा अतिशय गरीब कुटुंबातील युवक आहे. त्याचे वडील शंकर नरळे स्वतः पैलवान होते. मात्र घरची गरिबी आणि सततची दुष्काळी परिस्थिती यामुळे त्यांना आपली आवड जोपासता आली नाही. मात्र, त्यांनी आपली मुले कुस्तीत प्रविण व्हावीत यासाठी कष्ट घेतले. त्याला आज फळे लागू लागली आहेत. त्यांचा मोठा मुलगा अमोल याने आतापर्यंत अनेक कुस्ती स्पर्धा जिंकल्या आहेत. यापूर्वी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवली आहेत.

शालेय राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली असून यापूर्वी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याच्या कुस्तीतील कौशल्याची दखल घेत किरगिझस्तान येथे होणार्‍या 3 र्‍या आंतरराष्ट्रीय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली आहे. मात्र स्पर्धेसाठी साधारण 1 लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र, घरची गरिबी या स्पर्धेच्या आड येण्याची शंका निर्माण झाली. ही बाब गावातील युवकांना समजल्यानंतर गावातील उपक्रमशील शिक्षक शिवाजी शिंदे, शहाजी गोरवे, विमा सल्लागार बी. एस. शिंदे यांनी पै. अमोल नरळे मदतनिधी नावाचा वॉट्सअप ग्रुप सुरु केला. त्यामध्ये विविध मान्यवरांना सामील करुन मदतीचे आवाहन केले आणि बघता बघता सुमारे एक लाख रुपयांचा मदतनिधी जमा झाला.नुकतीच ही जमा झालेली रक्कम पैलवान अमोल नरळे यास त्याच्या आई - वडिलांसोबत त्याच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी डॉ. नानासाहेब शिंदे, नानासाहेब नरळे, कैलास तोरणे, राजाराम तोरणे, दादासाहेब नरळे, तायाप्पा तोरणे, दत्तात्रय शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते ही रक्कम अमोल नरळे यास प्रदान करण्यात आली. यावेळी अमोलने स्पर्धेत यश मिळवावे तसेच ऑलिम्पिक स्पर्धेतही धडक मारावी, त्यासाठी येणारा सर्व खर्च ग्रुपच्या माध्यमातून करण्याचा निश्‍चय करण्यात आला.