जिंती येथून आठ म्हशींची चोरी


कराड :  जनावरांच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी आठ म्हैशी चोरुन नेल्याची घटना जिंती, ता. कराड येथे मंगळवारी पहाटे घडली. चोरलेल्या म्हैशी आयशर टेम्पोतून नेल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे.

जिंतीचे पोलीस पाटील संतोष पाटील यांनी दिलेली माहिती अशी, जिंती गावातील सात ते आठ जणांची गावाबाहेरील हायस्कूलनजीक वस्ती आणि जनावरांची शेड आहेत. या वस्तीवरील जनावरांच्या शेडमधून संपत बापू पाटील, संतोष भगवान पाटील, रामजी विठ्ठल पाटील यांच्या प्रत्येकी 2, तर काशिनाथ बाळू पाटील आणि रघुनाथ बाळकू पाटील यांची प्रत्येकी 1, अशा आठ म्हैशी मंगळवारी पहाटे 2 च्या सुमारास चोरुन नेण्यात आल्या. म्हैशी नेण्यासाठी चोरट्यांनी आयशर टेम्पोचा वापर केल्याचे उंडाळे बसस्थानकावरील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, म्हैशी चोरीस गेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला.

जिंती गावातील काही जण भजनाच्या कार्यक्रमाला बाहेरगावी गेले होते. ते परत येत असताना उंडाळे नजीकच्या पुलाजवळ एक आयशर टेम्पो उभा असलेला त्यांनी पाहिला होता. त्याच टेम्पोचा म्हैशी नेण्यासाठी वापर झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर स्पष्ट झाले. कराड तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

No comments

Powered by Blogger.