जावलीकरांना आंदोलन करायला लावू नये
मेढा : वीज वितरण कार्यालयाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत भविष्यात तालुक्‍यातील कोणत्याही कार्यालयाच्या विरोधात जावलीतील जनतेला जनआंदोलन करावे लागू नये, असा इशारा सभापती अरुणा शिर्के व उपसभापती दत्तात्रय गावडे यांच्यासह उपस्थित सदस्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
जावली पंचायत समितीची मासिक सभा सभापती अरूणा शिर्के यांचे अध्यक्षतेखाली उपसभापती दत्तात्रय गावडे, सदस्य विजय सुतार, सदस्या जयश्री गिरी, कांताबाई सुतार, सभागृहाचे सचिव डॉ. संताजी पाटील व विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.

सभेच्या प्रारंभीच सभापती, उपसभापती व सर्व सदस्य यांनी वीजवितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही विभागात दोन दोन दिवस लाईट जात असेल तर सर्वसामान्यांचे जीवनमान विस्कळीत होते. लाईट नसल्याने पिण्याच्या प्रश्न निर्माण होतो. जनतेला आपल्या विरोधात आंदोलन करावे लागते, याचा अर्थ आपले काम समाधानकारक नाही. आपल्या कामात सुधारणा करा, असा इशारा सभापती अरूणा शिर्के यांनी दिला.

जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही कार्यालयाशी संपर्क साधतो पण समाधान कारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप सदस्य विजय सुतार यांनी केला. तर या पुढे कुठल्याही कार्यालयाच्या विरोधात जनतेला आंदोलन करावे लागू नये यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने दक्षता घ्यावी, असा इशारा उपसभापती दत्तात्रय गावडे यांनी दिला. दरम्यान, महिगांव परिसरातील विद्युत पोल वाकले असून ताराही जमिनीला टेकू लागल्या आहेत, असे सदस्या जयश्री गिरी यांनी सांगीतले. याप्रसंगी वीजवितरणचे अभियंता प्रशांत गाडे यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बैठकित प्रधानमंत्री घरकुल योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनाची माहिती शेती अधिकारी कुलकर्णी यांनी दिली तर स्वच्छ संरक्षण परिपत्रकाचे वाचन शिंदे यांनी केले. सामाजिक वनीकरण, वन विभाग जावली कार्यालयाकडील माहिती धनावडे यांनी दिली.

मेढा बाजार चौकात अपघातात मृत्यू पावालेल्या मायलेकींच्या कुटुंबियांना तातडीने वीस हजार रुपयांची मदत देण्यात आली असून विभागीय कार्यालयाकडून जी मदत येईल ती ही देण्यात येईल असे आगार व्यवस्थापक मेढा यांनी सांगितले. शाळांना लाईट बील हे घरगुती दराप्रमाणेच आकारण्यात यावे ‘ असा ठराव सभागृहात करावा अशी सुचना दत्तात्रय गावडे यांनी केली.

मेढा येथील पशु वैद्यकीय दवाखान्याचे इमारतीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून हुमगांव येथील काम सुरु करायचे आहे. दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत 8 कामे मंजूर असून त्यापैकी 3 पूर्ण असून समाजकल्याणची 4 पैकी 4 कामे पूर्ण असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, शेती विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत विभाग इत्यादी विभागाच्या कामकाजाचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांनी दिला. शिक्षण विभागाच्या उठावदार कामाकाजाबद्दल व शिष्यवृतीच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी, मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थी यांचा प्राथमिक स्वरूपात सभागृहाचेवतीने सभापती, उपसभापती, सदस्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments

Powered by Blogger.