Your Own Digital Platform

विलासकाका ‘यशवंत’ संप्रदायाचे वारसदार


कराड : यशवंतराव चव्हाण म्हणजे राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील संप्रदाय आहे आणि या संप्रदायाचे खरे वारसदार विलासराव उंडाळकर आहेत, असे गौरवोद‍्गार अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.

रयत संघटना व माजी सहकार मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर यांच्या राजकीय, सामाजिक कार्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा मागोवा घेणार्‍या ‘समाजकारणातील भगीरथ’ या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा येथील बाजार समितीच्या आवारात मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी अर्थतज्ञ डॉ. नीळकंठ रथ, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, आ. जयंत पाटील, कवी रामदास फुटाणे, निवृत्त पोलिस अधीक्षक डॉ. माधवराव सानप, अभय टिळक, निवृत्त सहकार आयुक्त दिनेश ओळकर, सिनेअभिनेते विलास रकटे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, अ‍ॅड. रविंद्र पवार, प्राचार्य गणपतराव कणसे, साहेबराव पवार, दादासाहेब गोडसे, प्रा. धनंजय काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, समाजकारण हे साध्य आहे तर राजकारण हे साधन आहे. मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी साधनच साध्य केले आहे. साधन, साध्य आणि विवेक याची गफलत उंडाळकर काकांनी केली नाही. सामाजिक काका म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतःची ओळख निर्माण केली. काकांनी विकासाची गंगा अहित कल्याणासाठी आणली. सहकार चळवळीचे शुध्दीकरण व स्थानिक स्वराज्य संस्थांचे सबलीकरण होणे गरजेचे आहे हे काम स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केले. हाच वारसा उंडाळकरांनी जपला.

डॉ. निळकंठ रथ म्हणाले, सध्या राजकारण हा शब्द तुच्छतेने घेतला जातो. कोणी चुकीचे काम करत असेल तर तो ‘पॉलिटीक्स’ करतोय असे लोक म्हणतात. यावरून राजकारणाचा पोत घसरल्याचे लक्षात येते.आत्ताची व्यवस्था तर खूपच मारक आहे. या परिस्थितीत उंडाळकर काकांनी राजकारण करत असताना साधलेले समाजकारण खूपच आदर्शवत आहे. ही आदर्श विचारांची मशाल पुढील पिढीने तेवत ठेवण्याची गरज आहे.

रामदास फुटाणे म्हणाले, स्पष्ट वक्‍तेपणामुळे काकांचे नुकसानच झाले आहे, मात्र त्यांनी होणारे नुकसान कधी मोजले नाही. त्यांची बांधिलकी समाजाशी होती. दूरदृष्टी व रसिक असे काकांचे व्यक्‍तीमत्व आहे. आपेलपणा कसा सांभाळावा हेही कांकाकडून शिकावे. आदर्श असेच त्यांचे व्यक्‍तिमत्व असून त्यांच्यावरील भगीरथ हा ग्रंथ तरूण पिढीने नक्‍की वाचावा. सध्या स्वप्न विकणारी अर्थव्यवस्था दारात आली आहे, रोजगार, अर्थकारण यासारखे महत्वाचे प्रश्‍न असतानाही धर्माच्या नावाखाली देश परत अधोगतीकडे नेला जात आहे. सध्याच्या देशात विचित्र पध्दतीने राजकारण सुरू आहे. तरूणांपुढे रोजगार, आर्थिक प्रश्‍न आवासून उभे असताना त्यांना धर्माच्या नावाखाली भडकवले जात आहे. धर्मांध विचारांमुळे तरुण पिढी भरकटत चालली असून तिला त्यांना योग्य दिशा दाखविण्याची गरज आहे.

यावेळी आ. जयंत पाटील, डॉ. माधवराव सानप, पी.बी. पवार, दिनेश ओउलकर यांची भाषणे झाली. प्रसाद कुलकर्णी, प्रा. धनाजी काटकर यांनी प्रास्ताविक केले. विकास जाधव यांनी सूत्रसंचालक केले. वसंतराव जगदाळे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.