पारंपरिक गणेशविसर्जन तळी खुली करा


सातारा : गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना साताऱ्यात अद्याप विसर्जन तळ्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. त्यावर सातारा डेव्हलप मूव्हमेंटने पुढाकार घेत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून पारंपरिक गणेशविसर्जन तळी खुली करा,अन्यथा कायम कृत्रिम तळे निर्माण करा अशी मागणी केली.

यापूर्वी पारंपरिक तळ्यांमध्ये विसर्जन होत होते. मात्र, उच्च न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना ती तळी विसर्जनासाठी बंद करण्यात आली. वास्तविक उच्च न्यायालयाने पारंपरिक तळ्यांमध्ये विसर्जन करण्यास मज्जाव केल्याचे प्रशासनाने जाहीर केले नाही. असे असताना शहरातील मोती, मंगळवार, रिसलदार,गोडोली व फुटक्‍या तलावात विसर्जनाला मज्जाव का केला जात आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच कृत्रिम तळे खोदून व बुजवण्यात पालिका प्रशासन भ्रष्टाचार करत असल्याची लोकधारणा झाली आहे. असे असताना कृत्रिम तळे निर्माणच करायचे असेल तर कायम स्वरूपी करण्यात यावे.कराच्या पैशातून साताऱ्याचा विकास होणे अपेक्षित असून तात्पुरत्या कृत्रिम तळ्यासाठी नागरिकांचा कष्टाचा व कराचा पैसा वळविण्यात येऊ नये. प्रशासनाने लवकरात लवकर पाऊले उचलून विसर्जनाचा प्रश्न ठोसपणे मार्गी लावावा अन्यथा संवेदनशील प्रश्नावर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी नगरसेवक विजय काटवटे, आशा पंडित, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी, गणेश पाटील, अमित शिंदे, अनिल भोसले व नागरिक उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.