Your Own Digital Platform

कृष्णा खोरेचे कार्यालय पेटवू : नरेंद्र पाटील


सातारा : 
जिहे-कठापूर योजना निधीअभावी रखडली आहे. मात्र, मंगळवारी दिल्लीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय जलआयोग विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक होत आहे. यात जर जिहे-कठापूर योजनेस नाबार्डच्या माध्यमातून निधी मंजूर झाला नाही, तर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यालय पेटवून देणार असून, त्या विभागाच्या एकाही अधिकार्‍यास लाभ क्षेत्रात फिरकू देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.नरेंद्र पाटील म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून दुष्काळी भागातील जिहे-कठापूर ही योजना रखडली होती. दुष्काळी भागातील जनतेचे अश्रू पुसण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ही योजना पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी पुसेगाव येथे आंदोलन करण्यात आले होते. 

या आंदोलनास आ. शशिकांत शिंदे, डॉ. सुरेश जाधव, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाला यश आले आणि कृष्णा खोरेचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांनी त्वरित काम सुरु केले. त्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन संपर्क नेते गजानन किर्तिकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांची समिती स्थापन केली. दुष्काळी जनतेचे अश्रू पुसण्यासाठीचे काम सुरु केले. त्यानंतर केंद्रीय जलआयोगाच्या माध्यमातून जिहे-कठापूर योजनेच्या निधीसाठी लढा देण्यास सुरुवात केली. त्या लढ्याला यश आले असून आज मंगळवार दि. 28 रोजी दिल्ली येथे उद्धव ठाकरे आणि केंद्रीय जलआयोग विभागाच्या पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. यात जिहे-कठापूर या योजनेस निधी मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे. जर हा निधी आत्ता मंजूर झाला नाही तर कधीच नाही, ही भूमिका घेत कशाचीही पर्वा न करता बुधवार दि. 29 रोजी पाटबंधारे विभागातील कृष्णा खोरेचे कार्यालय पेटवून टाकणार आहे. त्या विभागातील एकाही अधिकार्‍यास लाभ क्षेत्रात फिरू देणार नाही, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.

राज्य व केंद्र शासन हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. मात्र, दुष्काळी भागासाठी महत्वाची असलेली योजना रखडवली जात आहे. अशा या धोरणामुळे दुष्काळी भागातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. आता त्या जमिनीत गांजा आणि अफूची लागवड करणार आहे. नाहीतर जिल्ह्यातील कोणताही प्रकल्प करू देणार नाही, असाही इशारा यावेळी त्यांनी प्रशासनाला दिला. सध्याचे भाजप सरकार हे काँग्रेसच्या काळातील योजना नावे बदलून चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जिवंत असताना नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांत एकदाही त्यांचे नाव घेतले नाही. ते मयत झाल्यानंतर मात्र चार-चार किलोमीटर अंत्ययात्रेत चालून आमचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे दाखवतात. भाजप सरकार हे लबाड, ढोंगी व नाटकी सरकार असल्याचा आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला.

कोरेगाव भाजप नेते महेश शिंदे यांनी जिहे कठापूर योजनेस 800 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचे घोषित करून ठिकठिकाणी फ्लेक्स लावले होते. त्यांनी मंजूर झालेला निधी दाखवावा. तसे झाले तर त्यांची वाजत गाजत फटाके फोडून मिरवणूक काढू, असा टोलाही यावेळी दिला.

यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, भानुदास कोरडे, दिनेश देवकर, यशवंत जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.