Your Own Digital Platform

सातार्‍यात घुमू लागला ढोल-ताशांचा निनाद


सातारा : उच्च न्यायालयाने डॉल्बीवर पूर्णपणे बंदी आणल्यामुळे दिवसेंदिवस सातार्‍यात ढोल-ताशा पथकांना मागणी वाढू लागली आहे. गणेशोत्सव अवघ्या महिन्यांवर आल्यामुळे सातारा शहर व परिसरात ठिकठिकाणी ढोल-ताशा पथकांची सराव शिबिरे सुरू असून त्याला युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात सध्याच्या घडीला सुमारे 10 ते 15 ढोल-ताशा पथके असून त्यांच्या सरावामुळे परिसरात ढोल-ताशांचा आवाज घुमू लागला आहे. डॉल्बी वाजवल्यामुळे अनेक विपरित परिणाम घडत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे उच्च न्यायालयाने राज्यात सर्वत्र डॉल्बीवर बंदी घातली होती. याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनीही चांगलीच कंबर कसल्याने गतवर्षी अनेक गणेश मंडळांनी पुणे व कोल्हापूर येथील ढोल-ताशा पथकांना पाचारण केले होते. यंदाही या पथकांची मागणी मोठी असल्यामुळे सातार्‍यात अशा ढोल-ताशा पथकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक पथके सराव करताना दिसत आहेत.

शहरातील कोडोली, करंजे, शाहूपुरी, गोडोली या भागात असणार्‍या ढोल-ताशा पथकांनी सरावाला सुरूवात केली आहे. एका पथकामध्ये सुमारे 50 ते 100 जणांचा समावेश आहे. यामध्ये महिलांचाही सहभाग मोठा असल्याचे दिसते. काही पथकांनी जून महिन्यापासून सुरूवात केली आहे. त्याचप्रमाणे शहरात दोन ते तीन पथके ही फक्‍त मुलींचीच आहेत. ढोल-ताशा पथकांमध्ये धाडसी खेळांचाही काही पथकांनी समावेश केल्याने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीला वेगळा रंग प्राप्‍त होणार आहे.

या पथकांमध्ये मनोरे तयार करणे, विविध वाद्ये वाजवणे, शिस्तबध्द पध्दतीत हालचाल करणे, सुरात वाजवणे, मिरवणुकीसाठी स्टॅमिना वाढवणे या गोष्टी पथकांकडून करण्यात येत आहेत. शहरात असलेल्या पथकांमध्ये समाविष्ट होण्यासाठी युवक गर्दी करत असून पथकांमधील सदस्यांची संख्या वाढू लागली आहे. पुढील 15 ते 20 दिवस हा सराव सुरू राहणार आहे. सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत हे सरावसत्र सुरू असते. मोठ्या गणेशोत्सव मंडळांकडून आताच काही पथकांना ऑर्डर येणे सुरू झाले आहे. ही पथके साधारणत: 3 ते 4 तास ढोल-ताशा वाजवत असून त्यांच्या निनादामुळे परिसर चांगलाच घुमू लागल्याचे चित्र आहे.