उरमोडीनजीक अपघातात ग्रा.पं. कर्मचार्‍याचा मृत्यू


परळी : उरमोडीनजीक असलेल्या तीव्र चढावर शुक्रवारी सायंकाळी 7 च्या दरम्यान झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अन्य एकजण गंभीर आहे. परळीहून नित्रळच्या दिशेने चंद्रकांत सीताराम वांगडे (वय 55, रा. नित्रळ) व रवींद्र बाबुराव निपाणे (45, रा. निगुडमाळ) हे दोघे दुचाकीवरून निघाले होते. यावेळी परळी गावच्या पाठीमागे असलेल्या उरमोडी धरणानजीक असलेल्या चढावर त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊन अपघात झाला. अपघातादरम्यान दोघेही गंभीर जखमी झाले. 

रवींद्र निपाणे यांच्या डोक्याला जास्त मार लागल्याने रक्‍तस्त्राव होत होता.याच वेळी येणार्‍या जाणार्‍या वाहनधारकांनी त्यांना उपचारासाठी रिक्षातून परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रवींद्र निपाणे यांचा मृत्यू झाला असून चंद्रकांत वांगडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. रवींद्र निपाणे हे निगुडमाळ ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा वेदांत (वय 12), मुलगी वेदिका (वय 8) असा परिवार आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ज्या दुचाकीचा अपघात झाला ती दुचाकी नवीनच होती. त्या वाहनाचे पासिंगही झालेले नाही. दरम्यान, अधिक तपास तालुका पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments

Powered by Blogger.