Your Own Digital Platform

‘शहर कसं नसावं’ यासाठी पाटण पहावं


पाटण :  पाटण शहरात सध्या कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर झाल्याने स्थानिक नागरिक वैतागले आहेत. गेले अनेक दिवस येथे घंटागाड्या बंद असल्याने वैयक्तिक व सार्वजनिक ठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य वाढले आहे. तर कचर्‍यात ‘मलिदा ’ दिसत नसल्याने पदाधिकार्‍यांना याचे सोयरसुतक नसल्याचे जाणवत आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याचाही याला फटका बसत आहे. त्यामुळे पाटणला कोणी वाली आहे का ? या प्रश्‍नासह ’ शहर कसं नसावं ’ यासाठी एकदा नक्की पाटणला या’ असे म्हणण्याची वेळ पाटणवासियांवर आली आहे. सध्या देशात व राज्यात युद्धपातळीवर स्वच्छता अभियान असो किंवा प्लास्टिक बंदी यासाठी सार्वत्रिक प्रयत्न होत आहेत. 

मात्र त्याचवेळी पाटणचे नेमके उलटे चित्र पहायला व अनुभवायलाही मिळत आहे. येथे ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली आणि सरपंचाचा नगराध्यक्ष व सदस्याचा मेहरबान होऊन करही वाढला, मात्र सेवा सुविधांची पाचवीलाच पुजलेली दुरवस्था काही केल्या कमी झालेली नाही. देशात अच्छे दिनचे स्वप्न भंग पावल्यावर किमान पूर्वीचे बुरे दिन परत द्या अशीच मानसिकता येथे पूर्वीची ग्रामपंचायतच परत द्या अशी बनली आहे. तब्बल विस दिवसाहून अधिक काळ शहरातील वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक हा कचरा उचलण्यात आलाच नाही. 

ज्या ठिकाणी हा गोळा केलेला कचरा टाकण्याची अधिकृत व्यवस्था केली होती त्याठिकाणच्या आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी मज्जाव केल्याचे थातूरमातूर उत्तर येथे दिले जात आहे. तर मग यासाठीचे टेंडर अन्य अधिकृत बाबी, सोपस्कार याबाबत संबधितांनी शासनाला चुना लावला की पाटणच्या नागरिकांना ? असा प्रश्‍न येथे निर्माण झाला आहे. तर मलिदा, वाटा व स्थानिकांशी पंगा घेण्याचे धाडस याचाही परिणाम या कचरा विल्हेवाट प्रक्रियेवर झाल्याचे बोलले जात आहे.

तर नगरपंचायतीच्या दोन घंटागाड़्यांतून दैनंदिन आठ ते दहा फेर्‍यातून येथे शेकडो किलो कचरा उचलला जायचा मात्र गेले विस दिवस तो उचलण्यात न आल्याने ऐन पावसाळ्यात तो आहे त्याच ठिकाणी कुजला व सडला आहे. मुळातच पावसात माश्या, चिलटे व डासांनी लोक हैराण झाले असताना आता या कचर्‍यामुळे हे प्रमाण इतके वाढले आहे की त्यामुळे रोगराई वाढून दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत.

पाटणच्या प्रभारी मुख्याधिकार्‍यांचा कारभार सध्या कराडच्या मुख्याधिकार्‍यांकडे आहे.कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये 39 वा क्रमांक पटकावला .त्यामुळे देशात पहिल्या आलेल्या मध्यप्रदेशातील इंदोर शहराची पाहणी करण्यासाठी कराडचे पदाधिकारी, अधिकारी व पत्रकार यांचा अभ्यास दौरा नुकताच झाला. शहर कसे असावे यासाठी हा इंदोर दौरा झाला. आता पाटणचा कारभार पाहाणार्‍या याच मुख्याधिकार्‍यांनी याच टिमला ’ शहर कसे नसावे ’ हा धडा देण्यासाठी एकवेळ पाटणला आणावे असे आमंत्रणच पाटणवासीयांनी दिले आहे.