वरिष्ठ नेत्याच्या आदेशाने सभापती, उपसभापतीचा राजीनामा


वडूज : खटाव पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांच्यावर त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केल्याने दि. 3 रोजी खटाव पंचायत समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते. अविश्वास ठराव दाखल होणार का राजीनामा देणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. तथापि, वरिष्ठ नेत्याचा आदेशाने सभापती संदीप मांडवे व उपसभापती कैलास घाडगे यांनी राजीनामा दिल्याने अविश्वास ठरावावर अखेर पडदा पडला.

खटाव तालुक्‍याचे विधानसभेचे तीन मतदार संघात विभाजन झाल्याने खटाव तालुक्‍याला हक्काचा मतदार संघ नसताना पदासाठी राष्ट्रवादीमध्ये साठमारी झाली तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षास धोक्‍याची घंटा निर्माण होवू शकते. यामुळे पक्षातील बड्या नेत्याने आदेश दिल्याने सभापती व उपसभापतीने राजीनामे दिले असून पंचायत समितीत आता खांदेपालट होणार आहेत.

राष्ट्रवादी सर्वकाही अलबेल असल्याचा आव आणत असली तरी पक्षासाठी दुफळी निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. सदस्यांची बैठक तसेच अविश्वास ठरावावर चर्चा आणि मतदान घेण्यासाठी प्रांतानी बोलवलेल्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सात, भाजप दोन व कॉंग्रेसचा एक असे सदस्य हजर होते. परंतु, राजीनाम्याच्या नाट्यमय घडामोडीनंतर बैठक व अविश्वास ठराव झालाच नाही. 

या ठरावाच्या घडामोडीत राष्ट्रवादीच्या त्या सहा सदस्यांनी कॉंग्रेस व भाजपाच्या सदस्यांची मनधरणी केल्याचे गृहीत धरून राष्ट्रवादीत फाटाफूट होऊ नये तसेच लोकसभा व विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी यात लक्ष घालून सभापती व उपसभापतीचा राजीनामा घेऊन राष्ट्रवादीत वाढणारी दुफळी शांत केली अन्‌ येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. सध्या राजीनाम्या नाट्यानंतर राष्ट्रवादीत शांतता झाली असली तरी पदाधिकारी निवडीच्या वेळी नेत्यांना याबाबतची परिस्थिती आस्ते-आस्तेच हाताळावी लागणार आहे.

No comments

Powered by Blogger.