एक रिक्षावाला असा ही ..!
रोज सकाळी उठले की पहिल्यांदा घरासमोरील दुकानातून दूध आणणे व सोबत वर्तमानपत्र घेऊन येणे हा आता अनेक वर्षापासूनचा दिनक्रमातील एक भाग बनला आहे. त्याप्रमाणे काल सकाळी उठल्यानंतर दुकानात गेलो, दूधाची पिशवी व वर्तमानपत्र घेत बाजूला कांऊटरवर ठेवले अन्‌ मनुष्याच्या निसर्गनियमाप्रमाणे नेहमीप्रमाणे कांऊटरवरील इतर एक एक वर्तमानपत्र फुकट चाळत बसलो. वर्तमानपत्राचे एक एक पान उलटत असताना अचानक एक रिक्षा दूकानासमोर येऊन थांबली. रिक्षातून वयस्कर चालक उतरला व काऊंटरजवळ आला. 

त्याने काऊंटरवरील दोन वर्तमानत्रे घेत दूकानदाराला दहा रूपयांची नोट देत घेतलेल्या वर्तमानपत्रांची नावे सांगितली. दूकानदार इतर गिऱ्हाईकांच्या गडबडीत होता. त्याने दहा रूपयांची नोट घेऊन गल्ल्यात टाकली व गल्ल्यातील दोन रूपये रिक्षावाल्याला दिले. दूकानदाराच्या हिशोबाने प्रत्येकी वर्तमानपत्र चार रूपये दराने असा आठ रूपयांचा हिशोब केला होता. मात्र, रिक्षावाल्याने दोन रूपये परत करत आज घेतलेल्या दोन पैकी एका वर्तमानपत्राची किंमत पाच रूपये असल्याची आठवण दूकानदाराला करून दिली. दूकानदाराने ओके ओके म्हणत दोन रूपयाचा ठोकळा गल्ल्यात टाकला अन्‌ एक रूपया परत केला. हे सर्व काही क्षणात घडत असताना आपसुकच माझी नजर गेली अन्‌ रिक्षावाल्याने एक रूपयाच्या दाखविलेल्या प्रमाणिकपणाचा प्रसंग टिपला गेला. 

खरे तर शहरात कामानिमित्त वावरत असताना अनेक ठिकाणी रिक्षाचालकांची वेगवेगळी रूपे आजपर्यंत पहायला मिळाली होती. यापुर्वी रिक्षात प्रवासींची रोकड पोलिसांना परत केल्याच्या घटना ही पाहिल्या व वाचल्या होत्या. परंतु त्या रोकड रक्कमेपेक्षा एक रूपयाचा प्रामाणिकपणा जास्त भावला. कारण, प्रवासीची रिक्षात राहिलेली रोकड रक्कम ही पोलिसांच्या तपासात काही ही करून उघड होणारच या भितीने रिक्षाचालकाला ती रक्कम नाईलाजास्तव परत करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, दूकानदाराला एक रूपयाला फसविणे हे त्या रिक्षाचालकाला सहज शक्‍य होते. मात्र, त्याने तसे केले नाही. यावरून त्या रिक्षाचालकाचा मुळत: स्वभाव प्रमाणिकपणाचा असल्याचे आवर्जुन जाणवले. वास्तविक रिक्षा व्यवसायात येणारे हालाखीची परिस्थिती, कमी शिक्षण अशी लोक पहायला मिळतात. प्रत्येक दिवस तसे पोटाचे खळगे भरण्यासाठी आव्हानात्मकच. 

त्यात मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ठरलेली. अनेक जण कुटंबाचा गाडा हाकण्यासाठी दिवसरात्र व्यवसाय करताना देखील दिसून येतात. परिणामी काही जण व्यसनाच्या विळख्यात देखील अडकले जातात. समाजाच्या लेखी रिक्षावाल्यांचा कायम हीन वागणूकच मिळते. त्याच बरोबर पै-पाहुण्यांमध्ये ही मान-सन्मान नसतोच हे देखील पाहण्यास मिळाले. साहजिकच त्यामुळे काही रिक्षाचालकांच्या मनात चीड निर्माण होऊन प्रवासींकडून जादा भाडे आकारणे असे देखील प्रसंग घडत असतात. मात्र, समाजाने रोज आपल्यात असलेल्या मात्र दुर्लक्षित राहिलेल्या घटकाबद्दल संवेदना दाखविणे गरजेचे आहे. रिक्षाचालक अन्‌ प्रवासी यांच्यात केवळ भाड्याचे पैसे या धागा न राहता सामाजिक बांधिलकी निर्माण केली तर समाजात अनेक एक रूपयाची प्रमाणिकता दाखविलेले रिक्षाचालक निर्माण होतील हे नक्की.

No comments

Powered by Blogger.