Your Own Digital Platform

कलेक्टरने सांगावे, मी बनते नगराध्यक्षा


सातारा : जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचे सातार्‍यातील स्वागत सोनचाफ्याची फुले देऊन करणारे आणि व्हॅलेेंटाईन डेला गुलाबाची फुले देणारे खा. उदयनराजे भोसले सोमवारी मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर अचानकच तडकले. कलेक्टरच नगरपालिका पाहणार असतील, तर त्यांनी सदस्यांना राजीनामे द्यायला सांगावे. मीच पाहते पालिका आणि बनते नगराध्यक्ष असे म्हणावे, अशा शब्दांत खा. उदयनराजेंनी जिल्हाधिकार्‍यांची खिल्ली उडवली. दरम्यान, सातार्‍यातील गणेशमूर्तींचे विसर्जन मोती व मंगळवार तळ्यात होईल, असा निर्णयच खा. उदयनराजेंनी जाहीर करून टाकला, तर मी न्यायालयाच्या आदेशाशिवाय मोती व मंगळवार तळ्याला परवानगी देणार नाही, असे जिल्हाधिकार्‍यांनी निक्षून सांगितले. त्यामुळे उदयनराजे व जिल्हाधिकार्‍यांमध्ये ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर घमासान रंगले आहे.

सातारा शहर तसेच परिसरात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी योजना विविध परवानग्यांमुळे रखडल्याने खा. उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची भेट घेतली. यावेळी खा. उदयनराजे हे आक्रमक मूडमध्ये होते. जिल्हा प्रशासनाला कामे करायची नसतील, तर लेखी द्यावे. संबंधित विकासकामांसाठी आलेला निधी वेळेत खर्च झाला नाही तर तो लॅप्स होईल. विकास कामांना पुन्हा निधी मिळणार नाही. सातारा नगरपालिकेच्या भुयारी गटर योजनेसाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नसून न.पा.ने प्रस्ताव पाठवूनही त्यावर निर्णय का होत नाही? घरकूल योजनेच्या जागेसंदर्भातील निर्णय अद्यापही पेंडिंग आहे. सातारा पालिकेचे बजेट अजून मंजूर झालेले नाही. सातारा नगरपालिकेबद्दल कुणीही तक्रार करतं आणि तुम्ही दखल घेवून त्यावर कारवाई करता. जिल्हाधिकार्‍यांनी नगरपालिका कारभारात हस्तक्षेप करण्याचा काय संबंध? सातारा नगरपालिकेत आतापर्यंत जी अनियमितता झाली आहे त्याचीही चौकशी झाली पाहिजे. 

नगर विकास आघाडीच्या सांगण्यावरुन जशी विशेष सभा बोलावली तशीच बैठक आताही बोलवली पाहिजे. अहो, तक्रारी खूप येत असतात. मी रोज तक्रारींचा ढीग पाठवतो. जाणीवपूर्वक तक्रारी केल्या जात आहेत. पूर्वीपासून मंगळवार व मोती तळ्यातच विसर्जन होत होते. आताच्या एसपींनी ऐनवेळी भूमिका बदलली त्यामुळे अडचण निर्माण झाली. गणेश मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते रोज येवून विनवणी करत आहेत. त्यांना सारखंसारखं काय सांगायचं? आमचं आम्ही काय करायचं ते करु? जिल्हा प्रशासनाने सातारा पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दोन्ही तळ्यांत विसर्जन करण्यास लेखी आदेश द्यावेत. नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल. तळ्यांची नासधूस होता कामा नये. रोगराई पसरणार नाही याची काळजी घेवून उपाययोजना करण्यासंदर्भात बजवावे, असेही उदयनराजे यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. 

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या, माझ्याकडे येणार्‍या तक्रारीनंतर नगरपालिकेचे कोणतेही काम थांबवलेले नाही. मी बोलावलेली विशेष सभा ही कायदेशीर कामकाजाचाच भाग होता. जिल्ह्यात सर्वाधिक तक्रारी सातारा नगरपालिकेच्या येत आहेत. यासंदर्भात सीओंनी परिस्थिती हाताळायला हवी. नगरसेवकांनीही लक्ष द्यायला हवे. विसर्जन तळ्यासंदर्भात वर्षभर पाठपुरावा करुनही नगरपालिकेच्या कुणीही दखल घेतली नाही. ऐनवेळी काय करणार? हायकोर्टाच्या परवानगीशिवाय त्याठिकाणी विसर्जन करता येणार नाही. पूर्वीच्या एसपींसोबत फक्त चर्चा झाली. लेखी पत्रव्यवहार नगरपालिकेकडे नाही. कोर्टाची ऑर्डर आणा किंवा पर्यायी जागा बघा. या सर्व बाबी कायद्याच्या कसोटीत बसवाव्या लागतील. कोर्टाची परवानगी असल्याशिवाय मी तिथे विसर्जनाला परवानगी देवू शकत नाही आणि एसपींशी चर्चा करावी लागेल. संबंधित तळ्यांची पाहणी करणार असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांना भेटून आल्यानंतर त्यांच्या दालनाबाहेर पत्रकारांशी बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, कोण कलेक्टर? मानला तर देव नाहीतर दगड. नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. तिची स्वायत्तता काढली तर मग काय होईल? विरोधकांच्या काही तक्रारी असतील तर त्या सोडवण्यासाठी सीओ आहेत, नगरसेवक आहेत. नाहीतर कलेक्टरने सांगावे.. तुम्ही सर्वजण राजीनामे द्या. मी बघते सगळे. बनते नगराध्यक्ष आणि सांभाळते पालिका, अशी टीकाही खा. उदयनराजे यांनी केली.

दरम्यान, गणेश विसर्जन मंगळवार व मोती तळ्यातच व्हावे यासाठी सोमवारी सकाळी खा. उदयनराजे भोसले यांची विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेविका स्मिता घोडके, माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, राजू गोडसे यांनी भेट घेवून चर्चा केली. भाजप नगरसेवक विजय काटवटे, सागर भोगावकर, गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून मोती तळे व मंगळवार तळ्यातच विसर्जन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

जिल्हाधिकार्‍यांसमोरच ‘तू तू - मैं मैं’

उदयनराजेंच्या बैठकीनंतर गणेशतळ्यावरून सुरू असलेला वाद नंतर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्यासमोर नगराध्यक्षा सौ. माधवी कदम व मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यात निर्माण झाला. सीओ कोणतीही माहिती देत नाहीत. बाहेरच्या लोकांकडून मला कोणतीही गोष्ट समजते, अशी तक्रार नगराध्यक्षांनी केली. शंकर गोरे म्हणाले, नगरपालिकेची विशेष सभा बोलावून हे ठराव घेत नाहीत. लेखी देत नाहीत. चार दिवसांपूर्वी हायकोर्टात गेलो असता यापैकी माझ्याकडे काहीच नव्हते. त्यामुळे मला कोर्टात कागदपत्रे देता आली नाहीत. माझ्यावर पदाधिकार्‍यांचा विश्‍वास नसेल, तर मी रजेवर जातो. नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांचा हा संवाद समोरच सुरू राहिल्याने जिल्हाधिकारी संतापल्या आणि म्हणाल्या, तुमची भांडणे थांबवा. गणशोत्सव हा भावनेचा विषय आहे. त्यामध्ये अडथळा आल्यास जबाबदार कोण? नगराध्यक्षांनी निर्णय घ्यायला हवेत. सीओ लेखी मागणारच. विशेष सभेचा ठराव घेऊन प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करावे. कोर्टाच्या आदेशानंतरच निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

गणेश मंडळांचे कार्यकर्ते येऊन भेटत आहेत. विनवण्या करत आहेत. आम्ही त्यांना काय सांगायचे? यावर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन मोती व मंगळवार तळ्यांतच होणार. - खा. उदयनराजे भोसले

सर्वात जास्त तक्रारी सातारा नगरपालिकेच्या येत आहेत, त्याला मी काय करणार? न्यायालयाच्या परवानगीशिवाय मी मोती व मंगळवार तळ्यांत विसर्जनाला परवानगी देऊ शकत नाही. -जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल