आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

पावसा... पावसा... थोडं थांब ना आता!


सातारा : तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ कोसळणारा पाऊस थांबायचे नावच काढत नाही. त्यामुळे अवघं जनजीवन चिंब भिजून निघाले आहे. एवढे की घराबाहेर पडायलाही नको वाटू लागले आहे. गुडघ्यापर्यंत चिखल... शेतशिवारात जाणेही मुश्किल, कपडे वाळेनात ... गृहिणींची दैना, जर्किंग घालूनही कपडे ओली... नोकरदारांची गोची, शाळा भरताना आणि सुटताना हमखास रिपरिप... विद्यार्थ्यांचे हाल अशा नानाविध तर्‍हांनी या पावसाने आता नको नकोसे केले आहे. त्यामुळे सर्वत्र एकच सूर आळवला जात आहे, ‘पावसा पावसा थांब ना आता.’

पावसाने काही कामच उरले नसल्याने दिवसभर काय करायचे? असा प्रश्‍न ग्रामीण भागातील बायाबापड्यांना पडला आहे. रानात राबराब राबायची सवय असल्याने आता दिवसभर घरातच कोंडून घ्यावे लागत आहे. त्यामुळे कष्टकरी वर्गाची गोची होवून बसली आहे. अनेक ठिकाणी तर वाकळा शिवणीचा कार्यक्रम सुरु झाला आहे. मजूर महिलांनी रोजगारासाठी आता या शिवणीचा आधार घेतला आहे. पुरुष मजूर घरातच बसून आहेत. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शहरातील भाजी मंडईमध्ये शेतकरी चिखलातच भाजीपाल्याची विक्री करत आहेत. चिखलातून व पाण्यातून रस्ता काढतच ग्राहकांना मंडईत यावे लागत आहे. पावसाने भिजल्याने कचरा साचलेल्या ठिकाणी व परिसरात दुर्गंधी पसरली आहे. डासांची पैदास वाढल्याने विविध आजार फैलावले आहेत. घराबाहेर पडले तरी कायम पावसाची रिपरिप. चिखल तुडवत येˆजा करावी लागत असल्याने अनेक नागरिक घरातून बाहेर पडणे टाळताना दिसत आहेत. एकूणच ग्रामीण व शहरी भागातही पावसाने नको नकोसे केले आहे.

ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही पावसाने शहरवासियांची दैना उडवली आहे. सतत कोसळणार्‍या पावसाने मुलांना शाळेत जाताना व परत घरी येताना हाल होत आहेत. रेनकोट व छत्रीचा आधार घेतला तरीही रिपरिप थोडीफार भिजवल्याशिवाय रहातच नाही. हीच गत नोकरदारांचीही झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, नोकरदार यांच्या अंगातून दिवसभर ओलसरपणा काही जातच नाही. परिणामी साथीच्या आ जारांना निमंत्रण मिळाले आहे. सर्दी, खोकला, ताप, थंडी हे आजार तर घरोघरी पाहुणे बनून राहिले आहेत. त्यामुळे दवाखानेही हाऊसफुल्ल झाले आहेत.

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील सातारा, महाबळेश्‍वर, वाई, जावली, पाटण या तालुक्यात तर पावसाने अक्षरश: नको-नकोसे करुन सोडले आहे. कोसळणार्‍या पावसामुळे भात शेती बरोबरच भुईमुग, सोयाबीन, घेवडा ही पिके पिवळी पडू लागली आहेत. अशीच परिस्थिती जर काही दिवस राहिली हातातोंडाला आलेली पीके नाहीशी होतील तसेच उत्पादनावर परिणाम होईल. शेतात सतत पाणी साठु लागल्याने शेती कुजण्याच्या स्थितीत आहे.

भात, सोयाबीन, नाचणी, भुईमुग आदी पिके पिवळी पडू लागल्याने उत्पनात मोठया प्रमाणात घट होणार असल्याने शेतकरी हतबल झाला आहे पाऊस नव्हता म्हणूनही पिकांचे नुकसान आणि आता पाऊस असूनही पिकांचे नुकसान होणार त्यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. संततधार कोसळणार्‍या पावसाने ग्रामीण भागात, शहरातील काही गल्लीबोळात तसेच उपनगरातही चिखलाचा राडारोडा झाला आहे.

शेतकर्‍यांना शेतात जाणेही मुश्किल झाले आहे. शेतात जाण्यासाठी असणार्‍या पाणंद रस्त्यामध्ये गुडघ्याऐवढे पाय रोवत आहेत. जनावरांनाही चारा आणण्यासाठी चिखल तुडवत गेले तरी डोक्यावर गवत, कडवळ व मक्यांची ओझी घेवून येताना हमखास एक-दोन कोलांट्या उड्या खाव्याच लागतात. सतत कोसळणार्‍या पावसाने शेतातील कामे करता येत नाहीत. कामे बंद असल्याने हातावर पोट भरणारे मजूर अडचणीत आले आहेत.

जिल्ह्यातील दुष्काळी तालुके वगळता मान्सूनचा पाऊस पश्‍चिमेकडे गेल्या दोन महिन्यांपासून कमीˆजास्त असा दमदार कोसळत आहे. एकीकडे पावसाअभावी शेती अडचणीत असताना दुसरीकडे सातत्याने पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्‍चिमेकडील तालुक्यांत पावसाने ‘वाट’ लावली आहे. सर्वत्र पाणीच पाणी असल्याने घराबाहेरही पडणे मुश्किल झाले आहे. यंदा पावसाने अगदी वेळेत प्रारंभ केला. तत्पूर्वी वळीवाने काही ठिकाणी अगोदरच दैना उडवली होती. त्याला जोडूनच मान्सूनने सुरूवात केल्याने तब्बल दोन महिन्याहून अधिक काळ पावसाने हाहाकार माजवला आहे. थांबायचे तर त्याने नावच सोडून दिले आहे. थोडाफार जोर ओसरतोय असे वाटायला लागताच पुन्हा हा ‘बाबा’ रिपरिपायला लागतोच. पावसाचा हा खेळ तब्बल दोन महिने सुरूच आहे.