हंकारेंना आवरा पोलिसांची इज्जत सावरा


गेले दोन दिवस चर्चेत असणारा चेहरा म्हणजे पोलिस दलातील हंकारे दादा ! धोंडिराम हंकारे तसे साताऱ्यात पहिल्या पासुनच चर्चेत आहेत. अगदी सातारा बस स्थानकातील त्यांची कामगिरी तर इतिहासात लिहावी अशीच आहे. अशा या हंकारेंना आवरले तरच पोलिस दलाची प्रतिष्ठा सावरली जाईल.

धोंडिराम हंकारे मुळचे सांगली जिल्ह्यातले. नोकरी निमित्ताने ते साताऱ्यात आले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी नोकरी केल्यानंतर ते आले सातारा शहर पोलिस ठाण्याला. त्यानंतर त्यांना सातारा बसस्थानक पोलिस चौकी मिळाली. तिथे त्यांना जम्बु, शेळके, डोईफोड्यांचा रवी ही गॅंग भेटली.

अन खऱ्या अर्थाने हंकारेच्या वाटमारीला सुरूवात झाली. मग दारू पिलेला प्रवासी, बसस्थानकाबाहेर जीवाची चैनी करायला आलेले हौशे हे हंकारे व त्यांच्या गॅंगचे टारगेट असायचे. याचा फायदा असा होता दारू पिलेल्याला काही कळत नाही. अन्‌ बसस्थानकाबाहेर जीवाची हौस करायला आलेला बदनामीच्या भितीने कुणालाच काही बोलत नाही. नेमका हाच धागा पकडत गॅंग हंकारे भलतीच सैराट झाली होती.

एकदा ही मंडळी तर्र असताना रस्त्यालगत असलेल्या प्रवाशाच्या खिशाला हात घातला. प्रवाशाने तीव्र विरोध केल्याने साहेब चांगलेच पिसाळले. त्यात हा गडी तर्र त्यामुळे जरा धराधरी झाली. त्या प्रवाशाने गंचाडी पकडली, तसे गड्याने भिरकीट करत स्टॅंड चौकी गाठली. पण तो प्रवाशी जिद्दीला पेटला त्याने घडला प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यानंतर गॅंग हंकारेंनी कसबस हातापाया पडत प्रकरणावर पडदा टाकला होता. जर प्रकरण वाढले तर जोडीदाराचा बळी द्यायचा प्लॅन झाला होता. पण गड्याच नशीब बलवत्तर पुढे काहीच झाले नाही.

त्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याची निर्मिती झाली आणि यांचा मुक्काम तिकडे हलला. गड्याने बस्तान बसवण्यासाठी सरकारी पगारावर तिथे येणाऱ्या साहेबांची चाकरी सुरू केली. हळुहळु विश्‍वास संपादन केला. साहेबांच्या मागेपुढे फिरत स्वत:ची ओळख साहेबांचा खास म्हणुन केली (हे आम्ही नाही तर बिअर बारवाले सांगतात) त्यानंतर गड्याची डल्लामार एक्‍सप्रेस काही थांबली नाहीच. मटका अड्डे, पत्त्याचे क्‍लब, पानटपऱ्या,बिअर बार, रिक्षावाले, हातगाडीवाले कुणाला म्हणुन सोडले नाही.

एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण केसमध्ये तर या गड्याने चक्क तक्रारदार पित्यालाच तपासाच्या नावाखाली गोव्याची सफर घडवली होती. गोव्यात गेल्यानंतर जो काही गोंधळ घातला त्याला तर तोडच नाही. एखाद्या हिरोला लाज वाटेल असा डांन्स केला ( त्यासाठी डोक्‍यात आक्काबाई असावी लागते) तो पाहुन त्या पित्यानेच यांना मुक्काम साताऱ्याला हालवण्याची विनंती केली. त्यानंतर जे रामायण घडले ते तर भयानकच होते. संतपालेल्या त्या पित्याने पोलिस ठाण्यातच हंकारेची हजेरी घेतल्याची चर्चा होती. कसबस हातापाया पडून परत हे पण प्रकरण मिटवले होते. पण सुधरायच नाव नाहीच.

जसं करत गेला तसे पचत गेले त्यामुळे भानगडी वाढल्या पण कमी झाल्या नाही. म्हणतात ना अती केले की माती होते ते खरे आहे. हंकारेच्या भानगडींना वैतागलेल्या एकाने त्याला आडकण्याचा चांगलाच चंग बांधला होता. नेहमीप्रमाणे हंकारे राजवाड्यावरील मटका अड्ड्यावर मलिदा उकळण्यासाठी गेला होता. त्यानंतर जे काही घडले ते त्या व्हिडीओत आहेच. हंकारे म्हणजे आख्खे पोलिस दल नाही हे खरे असले तरी त्याच्यामुळे आख्खे पोलिस दल बदनाम होतय हे सत्य आहे.
परमेश्वर आणि पोलीस या दोघांमध्ये विलक्षण साम्य आहे. संबंध असो अथवा नसो, आपले प्रश्न सोडवायला लोक त्यांच्याकडे जातात. आणि जगातल्या कोणत्याच प्रश्नाबद्दल याच्याशी आमचा संबंध नाही, असे या दोन्ही प्रोफेशनमधल्या लोकांना कधीच सांगता येणे शक्‍य होत नाही.

परमेश्वर आणि पोलीस यांची नेमकी कामे तरी कोणती, याची यादी बनवायचे कष्ट आजवर कोणीही घेतलेले नाहीत. त्यामुळे आकाशाच्या छपराखालील कोणतेही काम झाले नाही की परमेश्वर आणि पोलीस यांना बिनधास्त त्याबद्दल लोक जबाबदार धरू शकतात. परमेश्वर हे काही कोटींमध्ये आहेत, पण त्यांनी कधी युनियन बनवलेली नाही. तसेच पोलिसांना युनियन बनवायची परवानगी नाही.

त्यामुळे या दोघांचे प्रश्न काय आहेत याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल समाजाची सहानुभुती आहेच. जे खरच प्रमाणिक पोलिस आहेत त्यांचे कौतक करायलाच पाहिजे, पण जे खुंकार आहेत त्यांना वेळीच आवरायला पण हवे.

No comments

Powered by Blogger.