युरोपच्या कार्निवल ट्रेनमध्ये घुमला मराठी ढोल-ताशा
वाई : युरोप खंडातील स्वीडनमधील लॅंड्सक्रोना शहरात दरवर्षी तीन दिवसांसा कार्निवर असतो. यामध्ये जगभरातून कलाकार सहभागी होऊन आपल्या कलेचा कलाविष्कार दाखवत असतात. यंदा मात्र, कार्निवलचे खास आकर्षण असलेल्या कार्निवल ट्रेनमध्ये घुमला तो मराठी ढोल-ताशा. युरोपवासियांसह इतर देशातील कलाकारही यावेळी मराठी ढोल ताशावर अक्षरश: थिरकले.
युरोप खंडातील स्वीडनमधील लॅंड्सक्रोना या शहरात दरवर्षी उन्हाळ्यात तीन दिवसांचा कार्निवल असतो. त्यावेळी जगभरातून वेगवेगळ्या देशांतील कलाकार येऊन आपापल्या कलेचे प्रदर्शन या ठिकाणी करतात. या कार्निवलचा महत्वाचा भाग म्हणजे कार्निवल ट्रेन किंवा कार्निवल मिरवणूक. 1992 पासून सुरु झालेली ही कार्निवल ट्रेन लॅंड्सक्रोना कार्निवलचे मुख्य आकर्षण ठरली आहे. संध्याकाळी कार्निवल मधील सर्व कार्यक्रम थांबवून, सर्व कलाकार कार्निवल ट्रेन बघण्यासाठी सर्वात चांगली जागा मिळवण्यासाठी चढाओढ लावतात. कार्निवल ट्रेन संपूर्ण शहराला संगीतमय करते. यावर्षी कार्निवल ट्रेन मध्ये साधारण 20 नृत्याविष्कार सादर केले गेले. थाई डान्स, लॅटिन सांबा डान्स, इंडोनेशिया डान्स, न्यूयॉर्क डान्स, बॉलीवूड डान्स, फायर फ्लो ओरिएंटल डान्स अशा काही प्रमुख डान्स प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. पण या सर्व अविष्कारांमध्ये मराठी ढोल-ताशा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला.
स्वीडनमधील लूंड या शहरातील हौशी मराठी मंडळींनी यावर्षी स्कोने ढोल-ताशा मंडळ स्थापन केले. स्कोने ढोल-ताशा मंडळाने कार्निवल ट्रेनमध्ये मराठी ढोल, ताशा, लेझीम आणि झांज खेळून मराठी परंपरेचे दिमाखदार प्रदर्शन केले. कार्निवल ट्रेन सुरु झाल्यापासून म्हणजे 1992 पासून असे प्रदर्शन पहिल्यांदा केले गेले. सर्व स्त्रियांनी नऊवारी साडी-नथ-फेटा असा मराठमोळा वेश परिधान केला होता, तर पुरुषांनी पांढरा झब्बा आणि जीन्स असा पोशाख परिधान केला होता. जीन्स-झब्बा-फेटा असा वेश परिधान केलेली मुलेही मागे नव्हती. इरा, सोहम, ध्रुव, अरिव आणि कुणाल यांनी भारतीय तिरंगा तसेच भगवा ध्वज फडकविण्याचे महत्वाचे काम केले. या कार्यक्रमाची सुरुवात शंखवादनाने झाली. महिलांनी लेझीम आणि झांज वापरून अप्रतिम कलाकारी सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर पुरुषांनी ढोलावर आणि ताशा वर ठेका धरत, प्रेक्षकांना महाराष्ट्रीयन केलेचे सांस्कृतिक दर्शन घडवले. या प्रदर्शनात लूंड या शहरातील समीर व मंजिरी देवळालीकर, अमित व अरूंधती चिपलकट्टी, गिरीश व वैशाली खराडे, आशिष व पूजा जोशी, स्नेहल शिंदे, निखिल व राजेश्वरी पुराणिक, संदीप व रंजना चाकणे आणि अविनाश व ऋतंभरा योगी ही कुटुंबे सहभागी झाली होती.
लॅंड्सक्रोनाचा परिसर ढोल-ताशा च्या आवाजाने, तसेच गणपती बाप्पा मोरया, जय भवानी-जय शिवाजी, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, यासारख्या अनेक मराठी घोषणांनी दुमदुमून गेला होता. युरोपीय रहिवाशांनी ढोलाच्या ठेक्यावर ताल धरत, मराठी वेशभूषेचे कौतुक करत मराठी मंडळींना उस्फूर्त दाद दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्कोने ढोल-ताशा मंडळाने खूप कष्ट घेतले आहेत. पुण्यामधून ढोल, ताशा, लेझीम इत्यादी साहित्य युरोप मध्ये नेण्यात आले. स्वीडन मधील नियम फार कडक असल्याने भर रस्त्यावर एखादे वाद्य जरी वाजवायचे असल्यास, त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. स्कोने ढोल-ताशा मंडळाने या कार्यक्रमासाठी स्वीडन मधील सर्व कडक नियम पाळून शहराबाहेरील एका फार्म-हाऊसवर सराव केला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रंजना चाकणे, नेहा गुंडेवार, चेतना कुलकर्णी, श्रुती मुकीम, विद्या साळुंके, स्वाती शिंदे, सुमित शिंदे, विशाल साळुंके, चंद्रप्रकाश, चंदरभाई यांच्यासह इतर लोकांचा समावेश आहे.
Post a Comment