Your Own Digital Platform

शाळा गळक्या...पण शिक्षण विभाग कार्पोरेट


सातारा : सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या बहुतांश ठिकाणी शाळा गळक्या असून या इमारती पडण्याच्या मार्गावर आहेत. ठिकठिकाणी पावसाचे पाणी वर्गात येत असल्याने विद्यार्थी अंगावर रेनकोट घालून शिक्षण घेत असल्याची धक्कादायक स्थिती असताना झेडपीचा शिक्षण विभाग मात्र लाखो रूपयांच्या पैशाचा चुराडा करत आहे. आपल्या विभागाला कार्पोरेट लूक देण्याचा घाट घातला असून त्यावर लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. त्यामुळे नागरिक व शिक्षणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या 2 हजार 710 प्राथमिक शाळा आहेत. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात तर अनेक शाळांची दयनीय अवस्था आहे. 

बहुतांश शाळांचे पत्रे उडून गेले आहेत तर काही ठिकाणच्या शाळांचे पत्रे गळके आहेत. काही शाळांच्या भिंती पडल्या असून अनेक इमारती धोकादायक आहेत. काही ठिकाणी डोक्यावर छत्री व अंगात रेनकोट घालून विद्यार्थी ज्ञानदानाचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना कोणतेही सोयरसुतक नाही. शाळांची पटसंख्या रोडावली असून बहुतांशी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.शाळांना वर्ग खोल्या मिळाव्यात, शाळांचे गळके पत्रे बदलण्यात यावेत अशा मागण्यांचे निवेदने देवून गावोगावच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे उंबरे झिजवले. मात्र, तरीही शाळेसाठी निधी देण्यात अधिकारी अपयशी ठरले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

एकीकडे शाळांची अशी दयनीय अवस्था झाली असताना दुसरीकडे प्राथमिक शिक्षण विभागाने लाखो रूपयांचा चुराडा करत कार्पोरेट होवू पहात आहे. शिक्षण विभागाच्या सर्वच्या सर्व कार्यालयातील सर्व जुनी कपाटे, टेबल, खुर्च्या, बाहेर काढून त्या जागी नव्याने रेडीमेड फर्निचर बसवण्याचा घाट सोमवारी घातला. या कार्यालयाला कार्पोरेट लूक देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत होते.

दुसर्‍या मजल्यावरील पॅसेजमध्ये सर्वत्र जुनी कपाटे, टेबल, खुर्च्या अन्य साहित्य आणून ठेवण्यात आले होते. त्यामुळे जो तो ‘हा काय प्रकार’ अशी विचारणा करत होता. याबाबत शिक्षण विभागातील जबाबदार अधिकार्‍यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी अधिक बोलणे टाळले. बांधकाम विभागाशी या कामाबाबत संपर्क साधला असता शिक्षण विभागाच्या डागडूजीबाबत आमच्याकडे काही नाही त्यांच्याकडेच असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचा उधळपट्टीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. अधिकार्‍यांच्या मदतीने खाबुगिरी सुरू असल्याचेच चित्र दिसत आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

जिल्हा परिषदेला जी शिस्त लावण्यात आली होती, ती कोण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चालू देणार नाही. बेकायदेशीर कामे जर कोण करत असतील तर ती जिल्हा परिषदेच्या बाहेर करावीत. जिल्हा परिषदेत नियमबाह्य काम करणार्‍यांवर कारवाई करणार. - डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी.