Your Own Digital Platform

जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत साताऱ्याची आनंदिता प्रथम


पाचगणी : पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल व मेप्रो फूड्‌स प्रॉडक्‍टस्‌ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये साताऱ्याची आनंदिता प्रदीप तर मुलांमध्ये असीम सय्यद विजेते ठरले.

पाचगणी येथील सेंट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन मेप्रो फूड्‌सच्या संचालिका सौ. राधिका निकुंज वोरा यांच्या हस्ते झाले. विविध वयोगटातील 370 मुला-मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात आनंदिता प्रदीप (सातारा) प्रथम, एकता लाहोटी द्वितीय तर मित्तल उर्वशी तृतीय ठरली. 14 वर्षाखालील मुलींच्या गटात ईनास शेख प्रथम, आदिती सुतार द्वितीय तर हृतिका उंबरकर तृतीय ठरली. मुलांच्या गटात हर्षल पाटील प्रथम, अथर्व पंढरपूरे द्वितीय तर आर्यन जाधव तृतीय ठरला.

12 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रताप पाटील (सातारा) प्रथम, यश पंढरपूरे (सातारा) द्वितीय तर ओंकार किरवे (वाई) हा तृतीय आला. मुलींच्या गटात मनोरमा कुलकर्णी प्रथम, चैत्राली जाधव द्वितीय तर शनश्री कळके तृतीय आली. मुख्य अर्बिटर म्हणून श्रीयुत प्रणव यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना सौ. कऱ्हाडकर म्हणाल्या, पाचगणी या शैक्षणिक केंद्रावर अशा स्पर्धांची वानवा दिसत आहे. त्यामुळे बुध्दिबळासारख्या स्पर्धा घेऊन आयोजकांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. अशा स्पर्धा वारंवार व्हाव्यात. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शार्मीन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षिका सौ. स्वप्ना केळकर यांनी यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडल्या.