Your Own Digital Platform

‘बामणोली वन्यजीव’च्या कामात घनशाघोळ


बामणोली : ढेबेवाडी, ता.पाटण येथील वन्यजीव विभागात झालेली निकृष्ट कामे व त्यातून फोफावलेला लाखोंचा भ्रष्टाचार या सर्व प्रकारच्या चौकशीची मागणी झाली असतानाच बामणोली वन्यजीव कार्यालय कार्यक्षेत्रातही भ्रष्टाचार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. ढेबेवाडीप्रमाणेच बामणोली वन्यजीव कार्यालयातील संपूर्ण कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.बामणोली वन्यजीव कार्यक्षेत्रातील गॅबियन बंधारे, जाळी बंधारे, जाळ रेषा काढणे, पाणवठे साफ करणे, अनगड दगडी बंधारे, कुरण विकास कामे, वनतळी यासारख्या कामात गैरव्यवहार झाल्याची चर्चा कांदाटी खोर्‍यासह संपूर्ण बामणोली भागात होत आहे. 

या प्रकारात कराड व कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकार्‍यांचा देखील समावेश असल्याचे बोलले जात आहे. कांदाटी खोर्‍यात गवत कुरनाचे काम केवळ कागदावरच केले आहे. हे काम कागदावर झाल्याने 21 एकर क्षेत्रावरील भात शेतीचे रानगव्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कामे कागदावरच झाल्याने येथे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय मोरे यांनी केला आहे.

बामणोली वन्यजीव कार्यालयास अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी वनक्षेत्रपाल नसल्याने या ठिकाणी भ्रष्टाचाराचा बकासुरच बोकाळलाय की काय ? असा संतप्‍त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. येथे अनेक चांगल्या अधिकार्‍यांची काम करण्याची इच्छा आहे. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चांगल्या अधिकार्‍यांना संधी दिली जात नाही. कर्तव्यदक्ष अधिकारी येथे आल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांना लिफाफा बंद मिळणारी रसद बंद होईल, या भितीपोटी या नियुक्तींना खो दिला जात नाही ना?, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

बामणोली वन्यजीव विभागाकडे सध्या कार्यरत असणारे अधिकारी यांना पूर्वी काम करत असलेल्या ठिकाणी निलंबित करण्यात आले होते. याच कालावधीत त्यांना बामणोली कार्यालयातील एका राउंडवर नियुक्त करण्यात आले आहे. निलंब काळातील त्यांची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र, निलंबनाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्याकडे सध्या याच कार्यालयाचा प्रभारी वनक्षेत्रपाल म्हणून कार्यभार देण्यात आला आहे. या अधिकार्‍यांच्या माध्यमातून कराड व कोल्हापूर कार्यालयातील अधिकार्‍यांना दरमहा रसद पुरवली जात असल्याची चर्चा व आरोप दबक्या आवाजात होत आहे.

सातारा नियोजन समितीच्या माध्यमातून बामणोली कार्यालय परिसरात होणार्‍या कामांचा आराखडा तयार करणे, मंजुरीला पाठवणे, मंजूर होऊन आल्यावर आपल्याच कार्यालयातील स्थानिक कर्मचार्‍याकडून काम पूर्ण करून घेण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे. या प्रकाराबाबत येथील वनरक्षकांनी उपसंचालकांकडे तक्रार केली असल्याचे समोर येत आहे. मात्र, त्यांचा वरीष्ठ अधिकार्‍यांना खुश करण्यात हातखंडा असल्याने त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

दोन ते तीन वर्षात या कार्यालयातील भ्रष्टाचारात वाढ झाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून झालेल्या सर्व कामांची ढेबेवाडी ता. पाटण कार्यालयाप्रमाणेच मंत्रालय स्थरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी बामणोली परिसरातून होत आहे.