Your Own Digital Platform

हरिभाऊ निंबाळकर स्मृती पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा


फलटण : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार, शिवसंदेशकार कॉ.हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी दि.3 सप्टेंबर रोजी फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे दिले जाणारे 15व्या वर्षाचे पत्रकार पुरस्कार जाहीर झाले असून दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका सौ. ज्योती आंबेकर, दै.‘पुढारी’चे वृत्त संपादक हरीष पाटणे, खटाव तालुक्यातील पत्रकार अविनाश कदम हे यावर्षीचे मानकरी ठरले आहेत. फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश सोनवलकर यांनी ही माहिती दिली.

वृत्तपत्र क्षेत्रामध्ये उत्कृष्ट, प्रभावी व विधायक कार्य करणार्‍या पत्रकारांना फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने गेल्या 15 वर्षापासून सन्मानित करण्यात येत आहे. यावर्षीचा श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर राजेसाहेब पुरस्कार दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका सौ.ज्योती आंबेकर यांना जाहीर झाला आहे. 25 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रगतशील शेतकरी कै. दशरथराव साळुंखे पाटील स्मृती पुणे विभागस्तरीय पुरस्कार दै. ‘पुढारी’च्या सातारा आवृत्तीचे वृत्तसंपादक हरिष पाटणे यांना जाहीर झाला असून 10 हजार रुपये रोख, सन्मान, चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. माजी नगरसेवक, उद्योजक कै. सुभाषराव निंबाळकर स्मृती जिल्हास्तरीय पुरस्कार खटाव येथील पत्रकार अविनाश कदम यांना जाहीर झाला असून 5 हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

कै. ह.भ.प.राजाराम जिजाबा झांबरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सामाजिक पुरस्कार चित्रपट अभिनेते धोंडीबा कारंडे यांना जाहीर झाला आहे. 5 हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार वितरण समारंभ सोमवार, दि. 3 सप्टेंबर 2018 रोजी महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे मान्यवरांचे हस्ते समारंभपूर्वक होणार असून या समारंभाला पत्रकार, हितचिंतक व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे विभागीय संपर्क प्रमुख श्रीरंग पवार, सातारा जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आनंद पवार, सचिव दिपक मदने व त्यांच्या सहकारी पदाधिकारी, सभासदांनी केले आहे