जिल्हा उत्स्फूर्त बंद राहणार


सातारा : मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी क्रांतिदिनी गुरुवारी सातारा जिल्ह्यात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने उत्स्फूर्त बंद राहणार आहे. सातारा ही मराठ्यांची राजधानी असून जिल्ह्यात बहुतांश समाज हा मराठा आहे. त्यामुळेच क्रांतिदिनी सकल मराठा समाज बांधवांचा आंदोलनाद्वारे उठाव होणार आहे.तब्बल 58 मूक मोर्चे काढल्यानंतरही सरकारने आरक्षण देण्यासाठी चालढकल केल्याने मराठा समाजाचे आता ठोक मोर्चे सुरू झाले असून राज्यात याला हिंसक वळण लागले आहे. गुरूवारी क्रांतीदिनी राज्यात व्यापक आंदोलन पुकारण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने ठिय्या आंदोलन शांततेत करण्यासाठी समाजबांधवांना आवाहन केले आहे. असे असले तरी राजधानी सातार्‍यासह जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त बंद पाळला जाणार आहे.

जिल्ह्यातील अकराही तालुक्यां-मध्ये तहसीलदार कार्यालयांसमोर मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वत्र ठिय्या आंदोलन होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेतली गेली आहे. ठिय्या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून सकाळी 10 वाजल्यापासून तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलनाला सुरूवात होेणार आहे. ठिय्या आंदोलनाबरोबरच जागरण गोंधळ, रॅली, व्याख्याने असेही कार्यक्रम होेणार आहेत.

11 ते 3 या वेळेत ठिय्या आंदोलन केल्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन दिले जाईल. शासनाच्या कृतीचा निषेध करुन आंदोलन शांततेत करण्यात येईल. सातारा शहर व सातारा तालुक्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. सातारा शासकीय विश्रामगृहावर समन्वयकांच्या बैठकीत सर्वमताने आंदोलन शांततेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकल मराठा समाजाने आपापल्या भागातील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनात सामील व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

ठिय्या आंदोलन यशस्वी करुन शासनाला आपल्या मागण्यांविषयीची जाणीव करुन देण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.