महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाकडून शासकीय संदेश प्रसार धोरणा विरोधात हरकती दाखल


फलटण : शासनाने नुकतेच नवीन शासकीय संदेश प्रसार धोरण 2018 चा मसुदा प्रसिध्द केला आहे. शासनमान्य जाहीरात यादीवरील वृत्तपत्रांसाठी व नव्याने शासनमान्य जाहिरात यादीवर समावेश करण्यासाठीची ही नियमावली/धोरण तयार केलेले आहे. परंतु या धोरणामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. वास्तविक पाहता लघु व मध्यम वृत्तपत्रेच शासनाच्या विविध योजना व भूमिका हे ग्रामीण भागात पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम करीत आहेत.

परंतु शासनाच्या या नव्या धोरणामुळे या वृत्तपत्रांच्या अडचणीत वाढ होणार आहे, त्यामुळे या संदेश प्रसार धोरणातील मुद्रित माध्यमांसाठीच्या अन्यायकारक अटींवर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ मर्या; फलटणच्या वतीने हरकती व सूचना घेतल्या असून त्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालकांकडे पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी दिली.

या मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी व हरकती नोंदवण्यासाठी संस्थेच्या फलटण येथील कार्यालयात रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली फलटणमधील दैनिके व साप्ताहिके यांच्या संपादकांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी सर्वांनी नोंदविलेल्या हरकती व सूचनांचा समावेशाचे निवेदन महासंचालकांकडे पाठविण्यात आले आहे. या बैठकीस दैनिक गंधवार्ताचे संपादक शामराव अहिवळे, दैनिक स्थैर्यच्या संपादिका श्रीमती उमा रुद्रभटे, संस्थेचे संचालक रोहित अहिवळे, प्रशासकीय संचालक अमर शेंडे, साप्ताहिक रामआदेशचे संपादक बापुराव जगताप, साप्ताहिक आस्था टाईम्सच्या संपादिका सौ.वैशाली चोरमले, साप्ताहिक आदेशचे संपादक विशाल शहा, साप्ताहिक फलटण अंजनचे कार्यकारी संपादक प्रदीप चव्हाण, साप्ताहिक शुभचिंतकचे संपादक प्रशांत अहिवळे, साप्ताहिक लोकजागरचे संपादक रोहित वाकडे, साप्ताहिक स्थैर्य एक्सप्रेसचे संपादक प्रसन्न रुद्रभटे, साप्ताहिक योद्धाचे संपादक मयुर देशपांडे, साप्ताहिक नमस्ते फलटणचे संपादक राजकुमार गोफणे आदी उपस्थित होते.

तरी मालक व संपादकांनी आपापल्या वृत्तपत्रामार्फत या हरकती व सूचना स्वतंत्रपणे शासनदरबारी dgipr.advt1718@gmail.com या ईमेल वर दाखल कराव्यात, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.


संस्थेच्यावतीने नोंदवण्यात आलेल्या हरकती व सूचना खालील लिंकवर उपलब्ध आहेत.
https://drive.google.com/open?id=1OLCjTHrgWpc2yyrLzbGdh8s3uQCdymSU

No comments

Powered by Blogger.