Your Own Digital Platform

रोहिणीला ज्युदोमध्ये दुसरे सुवर्णपदक


उंडाळे : टाळगाव ता. कराडची कन्या आणि शासनाच्या क्रिडा प्रबोधिनीची खेळाडू रोहिणी मोहिते हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर बलाढय चीनची तुल्यबळ प्रतिस्पर्धी तेपयीच्या ज्येदोकाला हरवून आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन महिन्यात सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. मकाऊ येथे झालेल्या आशियाई ज्युदो चषक स्पर्धेत 17 वर्षा खालील कॅडेट गट 40 किलो वजन गटात भारताचे नेतृत्व करण्यार्‍या महाराष्ट्रातील सातारा जिल्हयातील टाळगाव ता. कराड येथील रोहिणी मोहिते हिने बेस्ट ऑफ थ्री अंतिम लढतीत चायनीज तेपईच्या खेळाडू विरूध्द पहिल्या दोन लढती जिंकून 2-0 ने सुवर्णपदक पटकावले.

या अगोदर मे महिन्यात लेबॉनॉन येथे झालेल्या आशियाई ज्युनियर ज्युदो चॅम्पियनशिपमध्ये रोहिणीने सुवर्णपदक जिंकले होते. एवढेच नव्हे तर खेलो इंडिया तर्फे दिल्ली येथे 17 वर्षाच्या खालील खेळाडुसाठी प्रथम आयोजित राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले होते. तज्ञ प्रशिक्षक डॉ. सतीश पहाडे यांच्या कडुन अगदी प्राथमिक स्तरापासून रोहणी व तिची बहिण रागिणी हिने ज्युदोचे धडेे गिरविले आहेत.

शिबिरासाठी रोहिणी मोहिते हिची निवड झाली असून आशियाई स्तरावर दोन सुवर्णपदके पटकावल्याने रोहिणीकडे पदक जिंकून देणारी खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. आशियाई व ऑलिंम्पिक स्पर्धेत तिने उत्‍तम कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. खेलो इंडिया स्पर्धेतून परतल्यानंतर ती पुन्हा नियमित सरावाला सुरूवात करेल, अशी माहिती डॉ. पहाडे यांनी दिली. ती टाळगाव जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे.