Your Own Digital Platform

सभापतींकडून नेवरीत विकासकामांची पाहणी


कडेगाव : कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे यांनी नेवरी गावास अचानक भेट देत विविध कामांची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांबरोबर खुद्द ग्रामपंचायत सदस्यांनीही सभापतींसमोर तक्रारींचा पाढा वाचला. यावर सभापती आक्रमक होत ग्रामविकास अधिकारी एस. जे. तेरदाळे यांना कारवाईचे आदेश देत यासंबंधीच्या पत्रांची प्रत आपणाला पाठवण्याचे सांगितले अन्यथा त्यांच्यावरच कारवाईचे पत्र काढू असा दमही दिला.

मंगळवारी ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक आढावा बैठकीचे नियोजन चालू होते. तेवढ्यात अचानक सभापती मंदाताई करांडे यांनी भेट देत ग्रामपंचायत कार्यालयात बसून विविध कामांची आढावा घेतला. गावात रमाई घरकुल, वसंत घरकुल बाबत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करांडे यांनी केले. यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी गावात 14 व्या वित्त आयोगातील निधीतून सुरू असलेल्या गटार कामाबाबत तक्रार केली. यात ग्रामपंचायत सदस्य तुषार थोरात व अर्चना नितीनकुमार महाडीक यांच्या घरासमोर झालेल्या गटारीचे काम निकृष्ट झाल्याने पाणीच पुढे जात नसल्याचे समजले. त्यामुळे याठिकाणी पाणी साचून दुर्गंधी निर्माण होत असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगितले. यावर सभापतींनी प्रत्यक्ष कामावर जायची तयारी दर्शवत पाहणी केली.