Your Own Digital Platform

धर्मादय उपआयुक्त ऍड. नवनाथ जगताप सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित


सातारा  : सातारा जिल्ह्याचे भूमीपुत्र व सध्या पुणे येथे धर्मादय उपआयुक्त पदावर कार्यरत असलेले ऍड. नवनाथ जगताप यांनी गोरगरीब समाज घटकांना वैद्यकिय सेवा शासकिय स्तरावर प्राप्त करुन देण्यामध्ये घेतलेल्या पुढाकाराची नोंद सातारा सांगली जिल्हा मित्रमंडळांनी घेऊन पिंपरी चिंचवड येथे आमदार लक्ष्मणराव जगताप आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते ऍड. नवनाथ जगताप यांना “सातारा भूषण’ पुरस्कार देवून त्यांचा उचित गौरव करण्यात आला.

यावेळी महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, गौरीशंकर संस्थेचे चेअरमनसो प्रा. मदनराव जगताप, समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव, सचिव आय. एन. मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, शासनाच्या वैद्यकिय सेवाक्षेत्रातील योजना अत्यंत प्रभावीशाली ऍड. नवनाथ जगताप यांनी राबविल्याने असंख्य रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. ते करीत असलेले कार्य गोरगरीब घटकासाठी मोलाचे ठरत आहे.

यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले की, वंचित घटकाना वैद्यकिय सेवासुविधेचा लाभ देण्यासाठी ऍड. नवनाथ जगताप यांची नेहमीच आग्रहाची भुमिका राहिल्याने सर्वसामान्य समाज घटकांना या अधिकाऱ्याचा सार्थ अभिमान वाटतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपीचंद जगताप यांनी केले व राजाराम सावंत व संदिप जगताप यांनी सुत्रसंचलन केले. जयवंत फाळके यांनी आभार मानले.