म्हैशीने गिळले मंगळसूत्र!


कातरखटाव : म्हैशीने पेंडीतून चक्क पाच तोळे वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र गिळण्याचा प्रकार घडला. ही बाब शेतकर्‍याच्या लक्षात आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून ते पाच तोळे सोन्याचे मनिमंगळसूत्र सुरक्षितपणे बाहेर काढले आणि घरातील सर्वांनीच निश्‍वास टाकला.याबाबत अधिक माहिती अशी, मांडवे ता. खटाव येथील सुनील खाडे यांच्या भगिनी साधना पाटील (रा. वडगाव ज. स्वा.) या रक्षाबंधन निमित्त मांडवे येथे माहेरी आल्या होत्या. रविवार दि. 25 रात्री झोपताना साधना पाटील यांनी चोरट्यांच्या भीतीने पाच तोळे सोन्याचे मनिमंगळसूत्र व दीड तोळ्यांचा नेकलेस घरातील पेंडीच्या पोत्यामध्ये ठेवला. सोमवारी सकाळी सुनील खाडे यांनी नेहमीप्रमाणे प्लॅस्टीकच्या टफात पेंड काढून जनावरांना खायला घातली. त्यावेळी त्या प्लास्टिकच्या टफाच्या तळाशी दिड तोळ्याचा नेकलेस असल्याचे काही वेळाने निदर्शनास आले. त्यावेळी सोन्याच्या दागिन्यांवरून घरात खाडे कुटुंबियात चर्चा सुरू झाली.

तेव्हा साधना पाटील यांनी पेंडीच्या पोत्यात 5 तोळ्यांचे मनिमंगळसूत्र व दीड तोळ्यांचा नेकलेस ठेवल्याचे सांगितले.त्यावरून पाच तोळ्यांचे मनिमंगळसूत्र म्हैशीने खाल्ले असल्याचा संशय बळावला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर येथील तालुका लघु पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. नितीन खाडे यांना घटनेची माहिती देण्यात आली. डॉ. खाडे यांनी तातडीने म्हैशीच्या पोटाची शस्त्रक्रिया करून म्हैशीच्या पोटातून पाच तोळे वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र बाहेर काढले. या शस्त्रक्रियेत म्हैशीच्या पोटातून काही प्लास्टिक कागद, टेलिफोन वायर, असे साहित्यही बाहेर काढले. सुमारे दोन ते अडीच तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. डॉ. खाडे यांना डॉ. तानाजी खाडे, यशवंत साबळे यांनी सहकार्य केले.

No comments

Powered by Blogger.