Your Own Digital Platform

रिपाइंची सातारा शहरासह पाच तालुक्‍यातील कार्यकारिणी बरखास्त


सातारा : रिपाइंच्या सातारा शहरासह जिल्ह्यातील 5 तालुक्‍यांमधील कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिली. बरखास्त करण्यात आलेल्या तालुक्‍यांमध्ये नव्याने फेरबांधणी करण्यात येणार असून लवकरच मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांसाठी रिपाइंच्यावतीने साताऱ्यात महामोर्चा काढणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

सातारा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी अप्पा तुपे, सचिन वायदंडे, जयवंत वीरकायदे, निलेश गाडे, हरीश काकडे, मयूर कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, मागील काही महिन्यांपासून जे कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षाचे काम करताना थांबले होते त्यांचे काम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आजच्या बैठकीला जे उपस्थित राहिले नाहीत त्यांच्या बाबतीत ही आठ दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. खंडाळा, माण, महाबळेश्वर , कराड उत्तरसह सातारा शहराची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. कोरेगाव तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी 8 दिवसाची मुदत मागितली असून 20 ऑगस्टपर्यंत त्या तालुक्‍याचा अहवाल आला की पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. महाबळेश्वर तालुक्‍यासह पाचगणी व महाबळेश्वर शहरातील देखील कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. 

कार्यकारणी बरखास्त केलेल्या तालुक्‍यांमध्ये संघटकांची नेमणूक करण्यात आली असून त्या ठिकाणी नव्याने बांधणी करण्यात येणार आहे. पक्षाची जिल्ह्यात बांधणी प्रक्रिया पूर्ण होताच मागासवर्गीय समाज व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भव्य मोर्चा साताऱ्यात काढण्यात येणार आहे. तसेच रिपाइंचे नाव लावून संघटनांचा आमच्याशी कोणताही संबंध नाही. त्यांनी रिपाइंचा नामोल्लेख टाळून त्यांच्या संघटनेचे काम करावे. तसेच आज रिपाइंमध्ये भारिप व स्वारीपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला असून येत्या काळात रिपाइं जिल्ह्यात जोमाने काम करताना दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर बोलताना गायकवाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद केली होती. मात्र तत्कालीन मराठा समाजाच्या नेत्यांनी आरक्षणास नकार दिला होता. तसेच रिपाइंचे अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी देखील 10 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी सातत्याने मागणी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रत्येक समाजाची मागणी आहे. मात्र आंदोलनकर्त्या युवकांनी शांततेच्या मार्गानी आंदोलन केले पाहिजे कारण आरक्षण हे संविधानाच्या माध्यमातूनच मिळणार असून त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी समरस होणे गरजेचे आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.