ओला दुष्काळ जाहीर करा


वाई : वाई तालुक्‍यात संततधार पावसामुळे वाईच्या पश्‍चिम भागात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने कडधान्यांचे अधिक नुकसान झाले आहे. घेवडा, वाटणा, मुग, चवळी, सोयाबीन बटाटा इत्यादी पिकांचा या नुकसानीत समावेश आहे. दरम्यान, अद्यापही पाऊस सुरुच असल्याने शेतकरी वर्ग पूर्णत: अडचणीत आला असून शासनाने या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

यावर्षी सरासरीच्या मानाने जूनमध्ये पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाची 100 टक्के पेरणी केली. वाईच्या पश्‍चिम भागात भात शेती मोठ्या प्रमाणात असून भाताची लागण सर्वत्र झाली आहे. मात्र जुलैच्या मध्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची संततधार सुरु झाली. ती थांबण्याचे नावच घेत नाही. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याने हातातोंडाशी आलेली कडधान्याची पिके कुजून जाण्यास सुरुवात झाली आहे, अशा शेतीची पाहणी करून पंचनामे त्वरित करून वाई तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पश्‍चिम भागातील शेतकरी करीत असून त्या अनुषंगाने सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन वाईत करण्यात यावे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे त्वरित करण्यात यावेत व त्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

गेल्या महिनाभर पश्‍चिम भागात पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे भाताचे पिक समाधानकारक असले तरीही हाता-तोंडाशी आलेले कडधान्ये कुजून वाया जाण्याच्या मार्गावर आहे. शेतीमध्ये पिकांसाठी शेतकऱ्यांनी वापरलेली बी-बियाणे, खते, औषधे, मशागत यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. त्यामुळे अडचणीतला शेतकऱ्याचा पाय खोलात गेल्याचे चित्र वाईच्या पश्‍चिम भागात दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रशासकीय मदत मिळावी.
आनंदा वाडकर, शेतकरी, चिखली,

No comments

Powered by Blogger.