Your Own Digital Platform

जुगार कारवाईत ‘सायबर क्राईम’चे कलम


सातारा : सातारा शहर परिसरात पोलिसांनी बुधवारी रात्री दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई करत अटक केलेल्या 34 जणांमध्ये तडीपार केलेले दोघे जण सापडले असून पोलिसांनी या प्रकरणात सायबर अ‍ॅक्टचे कलमही ठोकल्याने अ‍ॅडव्हान्स जुगाराचा बुरखाच फाटला आहे. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या पथकाने 15 दिवसांमध्ये दुसरी मोठी कारवाई केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.अनिकेत चोरगे, पापा गवळी, दीपक पवार, राजेश कोळेकर, सचिन सुपेकर, उदय आमणे, भानुदास देशमुख, रवि विचारे, अक्षय क्षीरसागर, सागर बोभाटे, प्रताप सकटे, भगवान गायकवाड या संशयितांना राजवाडा बसस्टॉप परिसरात असलेल्या आडोशास जुगार खेळताना पकडले आहे. तसेच प्रभाकर मिश्रा, वसीम शेख, दिलीपकुमार नाफड, राहुल पंडित, रामदास पंडित, शितेज साठे, संतोष जगताप, नजीद पटवेकर, सागर महामुनी, समीर पठाण, राजेश कदम, मोहसिन पटवेकर, भरत वाघमारे, जयेश भाटकर, सौरभ जाधव, मुक्‍तार शेख, किरण माने, विजय कांबळे, चंद्रमणी आगाणे, नारायण गायकवाड, दादा भिंताडे, संतोष साळुंखे या संशयितांना सैदापूर येथील कच्छी याच्या घरात जुगार खेळत असताना पकडले आहे.

राजवाडा परिसरात केलेल्या कारवाईतून पोलिसांनी 41 हजार 285 रुपये रोख, मोबाईल व इतर साहित्य जप्‍त केले आहे. सैदापूर येथून पोलिसांनी रोख 1 लाख 4337 रुपये, जुगाराचे साहित्य, मोबाईल, वॉटरप्युरीफायर मशिन जप्‍त केले आहे. अशाप्रकारे दोन कारवाईतून रोख 1 लाख 45 हजार रुपये जप्‍त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी यातील एका गुन्ह्याला सायबर अ‍ॅक्टचेही कलम लावल्याने ही दुर्मिळ कारवाई मानली जात आहे. जुगार खेळण्यासाठी चिठ्ठीऐवजी अलीकडे मोबाईलचाही सर्रास वापर होत आहे. जुगारासाठी मोबाईलचा वापर केला जात असल्याने त्याला सायबर अ‍ॅक्ट लावण्यात आला आहे.

दरम्यान, जुगार अड्ड्यांवर सापडलेल्या नावांची माहिती घेतल्यानंतर त्यामध्ये काहीजण तडीपारीत असल्याचेही समोर आले. पोलिसांनी त्याबाबत खातरजमा केली असता प्रभाकर बलदेव मिश्रा (रा.एमआयडीसी) व वसीम इब्राहिम शेख (रा.रविवार पेठ) हे दोघे तडीपार असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, पोनि प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चव्हाण, पोलिस हवालदार राजू मुलाणी, सुजीत भोसले, वंजारी, सीमा भुजबळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.

सातारा पोलिसांनी बुधवारी रात्री दोन्ही ठिकाणांच्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकल्यानंतर त्यातील जुगारबाज पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलिसांनी पद्धतशीर त्यांची नाकाबंदी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करताना दोन नंबरच्या या धंद्यावरील सूचनांचे फलक लक्ष वेधून घेत होते. हाताने लिहिलेल्या सुमारे 5 ते 6 वेगवेगळ्या सूचना या ठिकाणी दिसत होत्या. एका सूचना तर चक्‍क अशी होती ः‘प्रिय ग्राहकांना विनंती. कृपया चिठ्ठी चेक करून घेणे, नंतर तक्रार चालणार नाही.’ दुसरी सूचनाही लक्षवेधी होती, ‘पाच रुपयांपासून दोन हजार रुपयांच्या नोटावर गुलाल, हळद यांचा रंग लागलेला असेल तर अशा नोटा स्वीकारणार नाही, याची नोंद घ्यावी.’ वास्तविक यातील बहुतेक जुगार घरातून असे पैसे चोरून आणून ‘डाव’ मांडत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.