Your Own Digital Platform

दोन दिवसांत चोरीचा गुन्हा उघडकीस


सातारा : पोवई नाक्यावरील दुकान फोडून त्यातील ५० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डिबी) अवघ्या दोन दिवसांत गुन्ह्यांची उकल करुन दोघांना अटक केली. दरम्यान, चोरीला गेलेला मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. अजित विनय गाडे (वय २४, रा. किडगाव) व विवेक राजेंद्र चव्हाण (वय २३, रा. धावडशी, दोघे जि. सातारा) अशी अटक केलेल्या दोंन्ही संशयितांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ रोजी मध्यरात्री दोन अज्ञात संशयितांनी आशिष जेजुरकर यांचे दुकान फोडून त्यातून लॅपटॉप, सीसीटीव्ही, कॅमेरे, डिव्हिआर कॅमेरा असा ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. दुसर्‍या दिवशी दुकान उघडताना चोरी झाली असल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर चोरट्यांबाबतची माहिती मिळाली. दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. दोघे संशयित त्यांच्या दुचाकीवरुन पोवई नाका येथे येवून तेथे चोरी केली असल्याची त्यांनी कबुली दिली. चोरट्यांनी मुद्देमालाबाबत विचारल्यानंतर तो लपवल्याची जागाही दाखवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला. तसेच संशयितांची दुचाकी असा एकूण १ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्‍यक पोलिस निरीक्षक बी. जे. ढेकळे, पोलिस हवालदार मुनीर मुल्ला, अनिल स्वामी, अविनाश चव्हाण, भिसे, गायकवाड, ढाणे कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.