आई तुळजाभवानीचा जागर करत मराठ्यांचा ठिय्या


सातारा : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सातारा तालुक्‍यातील मराठा बांधवानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आदोंलन केले. मराठा मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर मराठा समाज बांधवांनी आई तुळजाभवानीचा जागर घालत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या मारला.

यावेळी कोणाताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी सातारा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. शहरातील सर्व प्रकारची वाहतूक बंद होती. मराठा समाजाने केलेला बंद शांतेत व यशस्वी झाल्याचे संयोजकांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहाच्या सुमारास मराठा बांधव सातारा तालुक्‍यातील ठिकठिकाणावरून जमले. त्यानंतर जिजाऊ वंदना करून ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली. सकाळी आकरा वाजता जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना मराठा समाजाच्या मुलींनी मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारत मराठा बांधवांनी जय जिजाऊ, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे यासारख्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला.

सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत मराठा बांधवांनी भजन करत सरकारचा निषेध केला. दुपारी तीन वाजता मराठा मोर्चा आंदोलनातील शहीद मराठा बांधवाना श्रध्दांजली वाहुन तसेच राष्ट्रगिताने आंदोलानाची सांगता झाली.

साताऱ्यात गुरूवारी सकाळपासूनच व्यावसायिकांनी बंदला पांठीबा देत बाजारपेठ पुर्णपणे बंद ठेवली होती. आंदोलनामुळे शाळा, महाविद्यालयांनीही सुट्टी जाहीर केली होती. शहरातील व परिसरातील एसटी व खासगी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. एस टी बंद असल्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुकशुकाट होता.

बंद दरम्यान कोणाताही हिंसक प्रकार घडु नये म्हणुन जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक विजय पवार यांनी बंदोबस्ताचे बारकाईने नियोजन केले होते. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सातारा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील पेट्रोलपंप, बॅंकाचे व्यवहार, शाळा, कॉलेजेस बंद होती. मराठा आरक्षणासाठी पाळण्यात आलेल्या बंदला साताऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साताऱ्यातून एसटी डेपोतून एकही बस बाहेर न पडल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन ठप्प झाले.

मराठा आंदोलनात कोणाताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सातारा शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नारायण सारंगकर यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते. मागील आंदोलनावेळी झालेली हिंसा लक्षात घेता पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली होती. तसेच व्हिडीओ कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे यांची संख्या वाढवली होती. ऐनवेळी काही अनुचित घडलेच तर आंदोलकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरेही सज्ज होते. अग्नीशमन दल, राज्य राखीव दल, दंगा नियंत्रण पथके, सातारा शहर पोलिस असा तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंदोलना दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी वाढली होती. रस्त्यावरच समाज बांधवांनी ठिय्या मारला होता. त्यावेळी काही मराठा तरूण शेजारील इमारतीच्या आडोशाला उभे होते. संयोजक त्यांना वारंवार पुढे बसण्याची विनंती करत होते. पण तरूण पुढे येत नसल्याचे पाहत एका संयोजकाने ” तुम्हाला शिवाजी महाराजांची शप्पथ आहे, तात्काळ पुढे या. जे ठिय्यात आंदोलनात येणार नाहीत, अशा कार्यकर्त्यांची समाजाला गरज नाही” असे सुनावले. त्यानंतर तात्काळ मराठा तरूणांनी मिळेल त्या जागेवर ठिय्या मारला.

No comments

Powered by Blogger.