आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

कराड महावितरण ठेकेदारांच्या विळख्यात


कराड : अवाजवी बिले, वारंवार होणारे अपघात आदींमुळे महावितरण कंपनीला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत असताना या कंपनीभोवती ठेकेदारांचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. ठेकेदारच अधिकार्‍यांच्या अविर्भावात वीज कंपनी कार्यालयात वावरत आहेत. त्यांची दहशत इतकी की अधिकारीही त्यांच्यापुढे हतबल आहेत. इलेक्ट्रीक पोल, मीटर जोडणी यासह अन्य कामे कोणी करायची हे ठेकेदार लॉबीच ठरवते. वीज वितरणच्या कराड शहर, ओगलेवाडी, विजयनगर कार्यालयातील ठेकेदारांच्या वाढत्या ‘उद्योगा’वर प्रकाश टाकणारी लेखमाला आजपासून...महावितरण कंपनीकडून सातत्याने ग्राहकाभिमुख नवनविन योजना व संकल्पना राबविण्यात येत आहेत. परंतु दुर्दैवाने महावितरण कंपनीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्क्रीयतेमुळे या सर्व योजना ग्राहकांपर्यंत पोहचत नाहीत. त्या तशा पोहचणार नाहीत यासाठीच प्रयत्न होताना दिसतात. महावितरणने ग्राहकांना अचूक वीज बिले मिळावी याकरिता मिटर वाचन रिडिंग, वीज बिल भरणा, ग्राहक सुविधा यासारखे काही मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहेत. जेणे करून ग्राहकांना घरबसल्या वीज बिलाबाबत माहिती मिळू शकेल.

वीज ग्राहकांनी महावितरणच्या वेब साईटवर स्वतःचा मोबाईल क्रमांक रजिस्टर केल्यास त्यांना मीटर वाचन, वीज बिले तसेच खंडीत वीज पुरवठ्याबाबत तसेच नवीन वीज कनेक्शनसाठी पैसे भरून प्रतिक्षा यादीत असणार्‍या शेतकर्‍यांना व इतर वीज ग्राहकांना त्यांचा वीज पुरवठा केंव्हा जोडला जाणार याबाबत अद्यावत माहिती एसएमएस व्दारे मिळू शकते.

शेतकर्‍यांचे आर्थिक शोषन होवू नये व त्याच्या वेळेची व पैशाची बचत व्हावी हा यामागील हेतू. परंतु या सर्व योजनांवर बोळा फिरविण्याचे काम काही ठेकेदार मंडळी करत आहेत. याला कार्यालयातील अधिकारी खतपाणी घातल आहेत. अधिकारी व कर्मचारी महावितरण कंपनीने सुरू केलेल्या मोबाईल अ‍ॅप सुविधांचा वापर करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतकरी, ग्राहक यांना काही अडचणी असल्यास त्यांना ‘साहेबांना भेटा’ असा सल्ला दिला जातो. वास्तविक शेतकर्‍यांच्या संपर्कात असणारा वायरमनसुध्दा समाधानकार उत्तरे देत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना वीज कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयात खेटे घालावे लागतात.

नवीन वीज कनेक्शन व अन्य कामे घेण्यासाठी ठेकेदारांमध्ये चढाओढ सुरू असते. अनेकांनी आपली कार्यालयेच वीज कंपनी कार्यालयाबाहेर थाटली आहेत. हे ठेकेदार त्यांच्या कार्यालयात कमी पण वीज कंपनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या केबीनमध्ये बिनदिक्कत बसून असतात. त्यांच्या बैठकीचे ते अड्डेच बनले आहेत. शेतकरी, ग्राहक आला की त्याच्याकडे ठेकेदारांकडून चौकशी सुरू होते. तुम्हाला कनेक्शन लगेच मिळवून देतो, कामे करतो असे सांगून त्यांच्याकडील कागदपत्र घेतली जातात. हे कमी की काय म्हणून ग्राहकांनी जमा केलेली कागदपत्रेही ठरावीक ठेकेदार आल्याशिवाय पुढे सरकत नाहीत, अशा शेतकरी, ग्राहकांच्या तक्रारी आहेत. अधिकारीही ठरावीक ठेकेदारांची मर्जी सांभाळण्यात धन्यता का मानतात हे न समजण्याइतपत वीज ग्राहक दूधखुळे नाहीत.