Your Own Digital Platform

मराठा आरक्षण : विशेष अधिवेशनासाठी सातारचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार


सातारा : मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. कराड (जि. सातारा) तालुका मराठा समन्वय समिती सदस्यांनी साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींची भेट घेतली.

समाजाच्या मागण्यांबाबत राज्य शासन गंभीर नाही, अशी भावना राज्यभरातील मराठा समाजात आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी ज्याप्रमाणे इतर विषयांवर शासन विशेष अधिवेशन घेते, त्याप्रमाणे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, अशी मराठा समन्वय समितीची मागणी आहे. तसेच आंदोलनावेळचे गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, मात्र अजूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आमदारांसह सातारा जिल्हा बँकेंचे उपाध्यक्ष सुनील माने, संचालक राजेश पाटील - वाठारकर यांच्यापुढे समाजाच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील सर्व आमदार भेट घेणार असून त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.

लवकरच आपण मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार असून समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्यापुढे ठामपणे भूमिका मांडणार असल्याची ग्वाही आमदार शिंदे यांनी यावेळी दिली.

मराठा समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी शिंदे यांची भेट घेतली. शैक्षणिक फी ५० टक्के माफ करण्यात आल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनी साताऱ्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप बैठक झाली नसून मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे त्वरित बैठक घेण्याची मागणी उपजिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय कळवण्यात येईल, असे यावेळी सांगितले.