Your Own Digital Platform

निराधारांना “संजीवनी’च्या माध्यमातून दिला आधार


सातारा : येथील हेमंत फरांदे गरीब कुटुंबातील युवकांचे आजारपणामुळे जिल्हा रुग्णालयात निधन झाले. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या आणि घरची गरीबीची परिस्थिती असल्याने संजीवनीच्या माध्यमातून रविंद्र कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्याचे अंत्यसंस्कार होईपर्यंत सर्व मदत केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपासुन आजारपणामुळे रुग्णालयात भरती झालेला हेमंत राजेंद्र फरांदे या रुग्णाचे उपचारादरम्यान निधन झाले. डोक्‍यावरील आई -वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले होते. “आई मरो पण मावशी जगो’ या म्हणीप्रमाणे लहानपणापासून मावशीने सांभाळ केला होता. मात्र मावशीची घरची परिस्थिती नाजूक असल्याने कुटुंबाला एक वेळचे जेवण मिळणे पण नशीबात नव्हते. अशातच लहानपणापासून पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केलेल्या 35 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पोटचा मुलगा नसल्याने आधार हरपलेली मावशी पूर्णपणे हतबल झाली. मयताच्या मावशीने अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याचे छ.प्रतापसिंह भाजीमंडईतील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांना मदतीची हाक दिली.

संजिवनी सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी क्षणाचाही विचार विलंब न करता अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून मृतदेह ताब्यात घेतला. रवींद्र कांबळे यांनी हेमंत फरांदे यांच्या मावशीला शक्‍य तेवढी मदत केली आणि हिंदू रीती रिवाजाप्रमाणे मयतावर संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

साताऱ्यात अशा बेवारस अथवा निराधार व्यक्तींना रवींद्र कांबळे यांनी निस्वार्थीपणे आजपर्यंत तीसहून अधिक व्यक्तींना मदत केली आहे. तीस बेवारस मृत देहांचे अंत्यसंस्कार केले. माणसाच्या आयुष्याच्या वाटेवर शेवटी चार जणांची गरज खांदा देण्यासाठी लागते. या वाक्‍याला छेद देत रविंद्र कांबळे व त्याच्याबरोबर असणाऱ्या सहकारी खांदेकऱ्यांनीच हा सर्व विधी पूर्ण केला. तसेच तीन दिवसांनी अस्थी विसर्जना विधी केला.