पालिका कर्मचाऱ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा निर्धार


कराड :  गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लाडक्‍या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो. अशीच आस येथील पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही धरली असून यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. पालिकेत एकूण 375 कर्मचारी असून सर्वजण आपल्या घरी मातीच्या अथवा शाडूच्याच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. त्याचबरोबर पालिकेतील कामगार गणेश मंडळाची मूर्तीही शाडूचीच बसविण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत उतरलेल्या कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मनात पर्यावरणाचा ध्यास रुजला असल्याचे यावरुन स्पष्ट होते.

कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या स्पर्धेत चांगली कामगिरी बजावल्यानंतर 2019 च्या स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा भागही स्पर्धेत येण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्लॅस्टीक बरोबरच थर्माकोलवरही शहरात बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने अनेक नागरिक मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी थर्माकोलच्या मंदिराचा वापर करतात. तसेच इतर सजावटीसाठी प्लॅस्टीक साहित्याचा सर्रास वापर केला जातो. पालिकेने शहरातील सर्व व्यापाऱ्यांना प्लॅस्टीकचा वापर असणारी कोणतीही वस्तू दुकानात विक्रीस ठेवू नयेत, अशा सक्‍त सूचना केल्या आहेत. त्याचपध्दतीने थर्माकोल मंदिरावरही बंदी घालण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी विक्रीस वस्तू ठेवल्या नाहीत. तर नागरिकही त्याची मागणी करणार नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही याची सक्‍त अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

प्रतिवर्षी पालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी जलकुंड ठेवण्यात येतात. त्याचबरोबर निर्माल्य गोळा करण्यासाठी व्यवस्था ठेवलेली असते. शहरातील नागरिकांना आवाहन करीत असताना पालिका कुटुंबातील सदस्यांनीही त्याचा अवलंब करावा. यासाठी सर्व कामगारांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे. पालिका आवारात याबाबतचा माहितीफलकही लावण्यात आला आहे. घरी मातीच्या अथवा शाडूच्याच मूर्तीची प्रतिष्ठापणा करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. पालिका कर्मचाऱ्यांची रोजची सकाळ स्वच्छतेपासून सुरु होते आणि सायंकाळही शहर स्वच्छतेतूनच संपत असल्याने कर्मचाऱ्यांच्या मनोमनी पर्यावरणाचे संगोपन ही बाब रुजत चालली आहे. त्यामुळे पालिकेने केलेल्या आवाहनाला कर्मचाऱ्यांनीही प्रतिसाद देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार घेतला आहे.

शहरात कुंभार समाजाबरोबरच अनेक व्यावसायिक गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवत असतात. त्यांची माहिती काढण्याचे काम पालिकेकडून सुरु आहे. या सर्व विक्रेत्यांनाही माती व शाडूच्याच मूर्ती विक्रीसाठी ठेवण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण कराड शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यास मदत होणार आहे.

No comments

Powered by Blogger.