Your Own Digital Platform

सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 2 हजार दोनशे शालेय मुलामुलींनी बनवल्या शाडूच्या गणेशमूर्ती


सातारा : येथील डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शनिवारी सकाळी सुमारे 2 हजार दोनशे शालेय मुलामुलींनी शाडूच्या गणेशमूर्ती बनवून नवा विक्रमच स्थापन केला आहे. सुमारे दोन तास सुरु असेलल्या या उपक्रमाची सांगता सर्व मुलामुलींनी एकत्र येऊन गणेशाचा जयजयकार करीत या मूर्ती डोक्‍यावर धारण करुन उंचावत मोठ्‌या आनंदात घरोघरी नेल्या.

या कार्यक्रमाची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहल कुलकर्णी यांची होती. तर शाळेचे मार्गंदर्शक आणि शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव कुलकर्णी समितीचे सदस्य अमित कुलकर्णी आणि सारंग कोल्हापुरे यांनी या उपक्रमाचे आयोजनात मोठा सहभाग दर्शविला. शनिवारी सकाळी आठ ते 10 यावेळेत या सर्व शालेय मुलामुलींनी आपआपल्या वर्गात या गणेश मूर्ती साकारल्या आणि पहाता पहाता अनेक रुपातील गणेशाचे दर्शन मान्यवरांना घडले.

या उपक्रमासाठी सातारा येथील ज्येष्ठ कलादिग्दर्शक आणि सातारा, औंध संग्रहालयाचे सेवानिवृत्त अभिरक्षक लायन प. ना. पोतदार सर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्त्या संध्या चौगुले, प्रख्यात मूर्तीकार संतोष कुंभार, महेश पोतदार, महेश लोहार आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या गणेश मूर्ती बनवून झाल्यावर सर्व वर्ग गणेश सभागृहानजिकच्या मैदानात आपल्या गणेशमूर्तींसह हजर झाले आणि या सर्व हजारो मुलामुलींनी गणेश मूर्ती उंचावून धरत गणेशाचा जयजयकार केला. यावेळी मुख्याध्यापिका स्नेहल कुलकर्णी म्हणाल्या की, अनेक मान्यवर मूर्तीकारांनी या उपक्रमात सहभाग घेऊन मुलामुलींना शाळेत मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. सुमारे 15 पोती शाडू माती मुलांनी शाळेतच मळून प्रत्येक वर्गातून वितरीत केली आणि या हजारो गणेश मूर्ती बनवल्या गेल्या. यासाठी 45 स्वयंसेवक व स्वयंसेविकांनीही मदत केली. सामाजिक बांधिलकीचे भान डोळ्यापुढे ठेऊन घरोघरी या गणेशमूर्ती पालकांनी गणेशोत्सवात स्थापन कराव्यात आणि प्रदूषणाला आळा घालावा असे आवाहन शाळेतर्फे आपण केले आहे असे सांगितले.

शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव गोखले म्हणाले की, जसा या शाडू मातीला या मुलांनी आकार देत गणेशाची नव निमिर्ती केली तशीच या नव्या पिढीला चांगला आकार देत घडवण्याचे काम शाळा करीत आहे. व पर्यावरणपुरक उत्सवाला चालना देत आहे. ही आनंदाची आणि अभिमानाची आदर्श अशी अनुकरणीय गोष्ट आहे. बालगणेश, योध्दा गणेश, उभा, मांडी घातलेला, सिंहासनावरील, बाल कृष्ण रुपातील गणेश, नाचणारा गणेश, पानावर पहुडलेला गणेश, पगडीधारी गणेश अश्‍या अनेक प्रकारातील गणेश मुर्ती पहाताना मान्यवरांचे भान हरखून गेले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र आफळे यांनी केले. या उपक्रमाचे संयोजनासाठी पर्यंवेक्षक एस.व्ही पाटील, डी. जे. रावडे, एल. ए. दळवी, कलाशिक्षक संदिप माळी, घन:श्‍याम नवले तसेच सर्व शिक्षक शिक्षिका, पालक प्रतिनिधी, संगणक शिक्षिका, कार्यालयीन कर्मचारी, शिपाई बंधु यांनी सहभाग घेऊन मुला मुलींना मार्गदर्शन केले.