Your Own Digital Platform

आगामी निवडणुकीत महायुतीला 220 जागा


म्हसवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेला सुख, समृद्ध, आनंद व संरक्षण देण्यात सरकार यशस्वी झाले आहे. प. महाराष्ट्रात काँगेस व राष्ट्रवादीच्या सरकारने दुष्काळी भागातील जनतेचा पाणीप्रश्‍न न सोडवता त्यांच्या वाट्याचे पाणी पळवण्याचे पाप केले आहे.

यामुळे त्यांच्या पापाचा घडा भरला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रासप, आरपीआय ही महायुती 220 पेक्षा जास्त जागा मिळवून पुन्हा सत्तेत येईल, असा विश्‍वास महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी म्हसवड येथील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केला.

माण तालुक्यातील कापुसवाडी बंधारा ते महाबळेश्‍वरवाडी तलाव भरणे, 16 गावांच्या पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ तसेच विविध विकास कामाचा शुभारंभ, उरमोडीच्या पाण्याचे जलपूजन आदी कार्यक्रमानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ना. चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री ना. महादेव जानकर, ना.शेखर चरेगावकर, ना.सदाशिव खाडे, माजी आमदार डॉ. दिलिप. येळगावकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, पुरुषोत्तम जाधव, सचिन गुदगे, लतिका वीरकर, सीमा बनसोडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, प्रा. विश्‍वंभर बाबर, बाळासाहेब खाडे, डॉ. महादेव कापसे, जि. प. सदस्या सौ.सुवर्णाताई देसाई, विलासराव माने, आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मराठा व धनगर समाजाला खर्‍या अर्थाने व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण महायुतीचे सरकारच देणार असून आघाडी सरकारने या दोन्ही समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक केली. अवघ्या दोन वर्षात माण, खटाव तालुक्यातील लोकांना टेंभूचे पाणी देण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला असून या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा यासाठी पीक विमा योजना पूर्वीपेक्षा यशस्वीपणे राबविली असून काही शेतकर्‍यांना पिकापेक्षा पीक विम्याचे जास्त पैसे मिळाले. शेतकर्‍यांचे 34 हजार कोटींचे कर्ज माफ केले असून यामुळे 40 लाख शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. रस्ते व वीज यासारख्या पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले असल्याचे ना. पाटील यांनी साांगितले.

दुष्काळी जनतेच्या हक्काचे पाणी पळवण्याचे पाप काँग्रेसच्या आघाडी शासनाने केले आहे. महायुतीच्या सरकारने दुष्काळी जनतेच्या पाणी प्रश्‍नास प्राधान्य दिले आहे. या तालुक्यांचा दुष्काळी हा कलंक पुसून काढण्यासाठी उरमोडी, जिहे कठापूर योजना पूर्ण केल्या जातील. तालुक्याच्या उत्तरेकडील भागातील पाणी प्रश्‍नांसह अनिल देसाई, डॉ. दिलीप येळगावकर हे माण-खटाव तालुक्यातील जी कामे सुचवतील ती सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन महायुतीला विजयी करण्यासाठी कामाला लागावे व सर्वांनी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन ना. पाटील यांनी केले.

ना. महादेव जानकर म्हणाले, आजपर्यंत राज्यात म. फुले, राजर्षी शाहू, डॉ.आंबेडकरांचे नाव घेणार्‍यांनी त्यांच्या बगलबच्च्यांची कामे केली. मात्र, सामान्यांसाठी काहीच केले नाही. मी बहुजनांच्या उद्धारासाठी 34 वर्षे वनवास भोगला व याकाळात राज्याच्या कानाकोपर्‍यात भटकंती केली. माझ्या या वनवासाची कोणीही दखल घेतली नाही मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखल घेऊन मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. पूर्वीच्या सरकारने दुष्काळी भागातील पाणीप्रश्‍न सोडवणे गरजेचे होते, मात्र मताच्या जोगव्यासाठी पाणीप्रश्‍नांचे घोंगडे भिजत ठेवून निवडणुकीत पाणीप्रश्‍नाचे गाजर दाखवून सत्ता उपभोगली. या भागाचे पाणी पळवण्याचे पाप करणार्‍यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम करून काँग्रेस राष्ट्रवादीला किमान 20 वर्षे सत्तेवर येऊ देणार नाही, असेही ना. जानकर म्हणाले.

आगामी निवडणुकीत माण-खटाव हा मतदारसंघ भाजपला की रासपला याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर विचार विनिमय करून घ्यावा. तो मला मान्य असेल, असेही ते म्हणाले.

डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले, उरमोडी,जिहे- कठापूर, टेंभू योजना अस्तित्वात आल्या त्यावेळी येथील लोकप्रतिनिधी सांगलीत वेगवेगळे उद्योग करीत होते. त्यांच्या त्या उद्योगामुळे तेथील जिल्हा पोलिस प्रमुखांनी बेड्या घालून त्यांची धिंड काढली होती, आता मात्र, पाणीपूजन करून पाणी मीच आणले असे मिरवीत स्व: ताला जलनायक म्हणून घेत असले तरी ते खलनायक आहेत. प्रा.विश्‍वभंर बाबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी,भाजप,रासप,आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रास्तविकात बोलताना अनिल देसाई म्हणाले, माण-खटाव या दुष्काळी भागाचे नेतृत्व स्व. यशवंतराव चव्हाण ते माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. मात्र, या भागाचा दुष्काळ हटविला नाही व पाणीही दिले नाही. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी माण-खटावला टेंभूचे पाणी देऊन खर्‍या अर्थाने ते जलनायक बनले आहेत. माणमध्ये गल्लीबोळांत जलनायक फिरत आहेत. माण खटाववासीयांचे पाण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.