Your Own Digital Platform

माझ्या आठवणीतील शिक्षक, साळुंखे मॅडम


सातारा : आज शिक्षकदिन.... शालेय जीवनात प्रत्येकाचा एक शिक्षक आठवणीतील असतो. तसेच माझेही आहे. माझ्याही आठवणींच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आहे. अवघा दीड वर्षांचा सहवास त्यांचा लाभला मात्र त्या कालावधीत जीवन काय आहे आणि ते कसे जगावे याचा धडाच त्यांनी घालून दिला. माझ्या आठवणीतील शिखक म्हणजे शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची नात गीतांजली साळुंखे मॅडम.

माझे ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत झाले होते. डॉ. बापूजी साळुंखे यांनी ही संस्था उभारली होती. त्यामुळे त्यांच्या विषयी खूप वाचनात आले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती होती. २००९ ला मी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात आर्ट्स ला प्रवेश घेतला. ११ वी ची पहिली सेमिस्टर झाल्यानंतर पूर्वीच्या राज्यशास्त्राच्या साबळे मॅडम यांची बदली झाली. त्यांच्या जागी नवीन शिक्षक येणार आहे असे सांगण्यात आले होते. ४ दिवसानंतर वर्गामध्ये राज्यशास्त्र विषयाच्या नवीन मॅडम आल्या असून शेजारील वर्गात तुमचा तास होणार आहे असे समजले. तेव्हा ११ ते १२ विद्यार्थी दुसऱ्या वर्गात गेलो होतो. तेव्हा आमची पहिली भेट झाली.
पहिल्या तासाला मॅडमनी सर्वांची ओळख करून घेतली होती. त्यावेळी माझ्या एका मित्राने मी सायन्स सोडून आर्ट्स ला आल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना वाईट वाटले. आमचा ११ बी हा वर्ग होता. या वर्गात समाजशास्त्र विषयाची मुले जास्त होती. त्यामुळे आमचा राज्यशास्त्रचा तास दुसऱ्या वर्गात होत होता. कमी मुले असल्याने वैयक्तिक लक्ष देऊन त्या शिकवत होत्या. त्यामुळेच कोणाचाही विषय राहत नसे. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी होती.

 एखादा पाठ शिकवायचा असेल तर मुद्देसूद विषय समजून देण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे त्यांनी शिकवलेलं चांगले लक्षात राहत होते. कधी कधी मुलांना तोच तोचपणा येत असल्याने त्या पाठ न शिकवता वेगळे काहीतरी करण्यास सांगत होत्या.

कॉलेज मधील विषयांसोबत जीवनातील विषय तुम्हाला हाताळता आले पाहिजेत असे त्या नेहमी सांगत होत्या. ११ वी मध्ये माझा आर्ट्स मध्ये ३ रा क्रमांक आला होता. मात्र जे गुण मला पडले होते ते त्यांना आवडले नाहीत. त्यावेळी त्यांनी हे मार्क फारच कमी असल्याचे सांगूण अभ्यासावर भर देण्यास सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विषय पक्का होतो. पुस्तकी ज्ञाबरोबरच व्यावहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे असे त्या सांगत होत्या. 

महाविद्यालय असल्याने त्यांनी शिस्तीत थोडी ढील दिली होती. मात्र याचा कोणी गैरफायदा घेतला नाही. त्यांच्या विषयातील ज्ञान हे आवश्यक होते. त्याचबरोबर सामाजिक जीवनात आपली काय भूमिका असावी हे शिकवले. त्यांची ही शिकवण आजही मी आचरणात आणतो. त्याचा मला पुढच्या शिक्षणात आणि आयुष्यात उपयोग होत आहे. मला त्यांचा जो काही सहवास लाभला त्यामध्ये अभ्यासा पेक्षा खूप काही शिकायला मिळाले.. ८ वर्षे उलटून गेल्यानंतरही आज त्यांची शिकवण आचरणात आणतो...