विसर्जनासाठी कृत्रिम तळे


सातारा : सातार्‍यातील मंगळवार तळ्यातील विसर्जनाबाबत जिल्हा सरकारी वकील तसेच जिल्हा पोलिस प्रमुख यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्‍त झाला आहे. मात्र, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दौर्‍यात व्यस्त असल्यामुळे बंद लखोट्यात असलेला निर्णय कळू शकला नाही. सोमवार, दि. 17 रोजी दोन्हीही लखोटे उघडले जाणार असून त्यानंतर जिल्हाधिकारी मंगळवार तळ्यातील विसर्जनावर निर्णय घेणार आहेत. दरम्यान, एकीकडे मंगळवार तळ्याबाबतचा निर्णय प्रलंबित असताना प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत बुधवार नाक्यावर भव्य कृत्रिम तळे खोदून पर्याय उपलब्ध केला आहे.

सातार्‍यातील विसर्जन तळ्यावरून गणेश मंडळांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच खा. छ. उदयनराजे भोसले यांनी मंगळवार तळ्यातच गणेश विसर्जन होणार असल्याचे जाहीर सांगत प्रशासनाला आव्हान दिले. दरम्यान, महसूल आयुक्‍त डॉ. दिपक म्हैसेकर हे शुक्रवारी सातारा दौर्‍यावर असताना खा. उदयनराजे यांनी त्यांची भेट घेवून मंगळवार तळ्यासंदर्भात चर्चा केली.

 गेली तीन वर्षे मंगळवार तळ्यात विसर्जन न करता कृत्रिम तळ्यात विसर्जन केल्याने यावर्षीही कृत्रिम तळ्यातच गणेश विसर्जन करावे, असे मत आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्‍त केले. मात्र, जिल्हा परिषदेने संबंधित जागा बंदिस्त करुनही जागा कृत्रिम तळ्याला देता येणार नाही, असे नगरपालिकेला पत्र दिले. त्यामुळे कृत्रिम तळे काढता आले नसल्याचे खा. उदयनराजेंनी आयुक्‍तांच्या निदर्शनास आणले. त्यावर आयुक्‍तांनी जिल्हा परिषदेस संबंधित जागा यावर्षापुरती कृत्रिम तळ्यासाठी द्यावी, अशी सूचना केली. तसेच मंगळवार तळ्यासंदर्भात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना संबंधित अभिप्राय मागवण्याचे त्यांनी आदेश दिले होते.

त्यानुसार जिल्हा सरकारी वकील आणि जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना शनिवारी अभिप्राय सादर केला. मात्र, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल या वरिष्ठ अधिकारी दौर्‍यावर असल्याने दिवसभर कामात व्यस्त होत्या. त्यामुळे डीजीपी आणि एसपींनी पाठवलेल्या अभिप्रयाचा लखोटा फोडता आला नाही. त्यामुळे या लखोट्यात दडलंय काय? याची उत्सुकता सातारकरांना लागून राहिली आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नगरपालिकेच्या सहकार्याने बुधवार नाक्याजवळ जिल्हा परिषदेच्या छत्रपती प्रतापसिंह शेती फार्मच्या जागेमध्ये कृत्रिम तळे खोदण्यास सुरुवात केली. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सातार्‍यातील गणेश मंडळांच्या भावनांचा विचार करुन मध्यवर्ती ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय करुन द्यावी, अशी मागणी केली होती.

कृत्रिम तळे खोदण्यासाठी सकाळपासून तीन जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरु करण्यात आले आहे. हे काम वेगाने व्हावे यासाठी आणखी दोन जेसीबी लावण्यात येणार आहेत. दोन दिवसांत तळ्यांच्या खोदकाम पूर्ण करा, असे आदेश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. सध्या हे तळे जलसंपदाच्या यांत्रिक विभागाकडून काढण्यात येत आहे. या तळ्यावरील खर्च कोण करणार? यावर चर्चा सुरु झाली आहे.

No comments

Powered by Blogger.