Your Own Digital Platform

भाजपरूपी कॅन्सर मुळापासून उखडा


म्हसवड : भ्रष्टाचारातून पैसा आणि पैशातून सत्ता मिळविण्याचे भाजपचे धोरण आहे. सर्वच आघाड्यांवर निष्क्रिय ठरलेले आणि सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेले हे सरकार राज्याला व देशाला लागलेला कॅन्सर आहे. हा कॅन्सर मुळापासून उखडून टाका. लोकशाहीची मूल्ये जपणार्‍या काँग्रेस पक्षाला साथ देऊन देश व राज्य भाजपमुक्‍त करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. दरम्यान, म्हसवडमध्ये भाजप व विरोधकांविरोधात विक्रमी गर्दी जमवून आ. जयकुमार गोरे यांनी आपला जलवा पुन्हा एकदा दाखवून दिला.

काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा चौथ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पोहोचली. म्हसवड येथे भव्य दुचाकी रॅलीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील बाजार पटांगणावरील आयोजित विराट सभेत खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री डी.पी. सावंत, आ. डॉ. विश्‍वजित कदम, आ.जयकुमार गोरे यांच्यासह काँग्रेसच्या मान्यवरांची उपस्थिती होती.

खा. चव्हाण म्हणाले, राज्यातले आणि केंद्रातले भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात शेतकर्‍यांना शेतीसाठी लागणार्‍या ट्रॅक्टरवरच्या सुट्ट्या भागांवर आणि इतर शेती औजारांवर जीएसटी लावणार्‍या या सरकारने आता विहिरीतल्या पाण्यावर टॅक्स लावला आहे. खोटी आश्‍वासने देऊन जनतेची फसवणूक करणार्‍या मोदी आणि फडणवीसांच्या फसव्या धोरणांवर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार 100 टक्के येणार असून जयकुमार तुम्ही आतापासून कामाला लागा, येथील जनता तुमच्या पाठीशी आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुमचे भवितव्य उज्वल आहे, असे कौतुकोद‍्गारही खा. अशोक चव्हाण यांनी काढले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात विकासात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची भाजप-शिवसेना सरकारने अधोगती केली. शेतीमालाला भाव नाही. कर्जमाफी मिळाली नाही. शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळत नाही. नुकसानीची मदत मिळत नाही. जनतेला मदत करण्याऐवजी सरकार इंधनावर कर लावून सर्वसामान्यांची लूट करत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. हजारो लोकांचा रोजगार गेला आहे. भाजप शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वच घटक अडचणीत आले आहेत. राज्यावर पाच लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. भाजप शिवसेनेला जनतेच्या प्रश्‍नांची जाणच नाही त्यामुळे ते प्रश्‍न सोडवू शकत नाहीत. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही. जयकुमार येथील स्वाभिमानी जनतेसाठी संघर्ष करतोय.

जयकुमारच्या जिद्द व चिकाटीमुळेच माणच्या शिवारात उरमोडीचे पाणी आले आहे, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यातील व देशातील लोकविरोधी सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला असून या शिशुपाल रुपी सरकारचे 100 आपराध पूर्ण झालेत.त्यांना जनतेने हद्दपार करावे. येथील जनतेने लोकांच्या भावनेला समर्पित झालेला जयकुमारसारखा संवेदनशील आमदार निवडून दिला. भाजपच्या पापाचा आता घडा भरला असून 2019च्या विधानसभेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

आ. विश्‍वजित कदम म्हणाले, महागाई भडकली आहे, रोजगार नाहीत, दुष्काळी भागाकडे लक्ष नाही. धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाची फसवणूक या सरकारने केली आहे. दुष्काळी तालुक्यांच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष सत्तेवर येणे आवश्यक आहे. कोणत्याही आपत्तीवर मात करण्याची धमक जयकुमार गोरे यांच्यात असल्यामुळेच या भागात नैसर्गिक परिवर्तन झाले आहे.

माण खटावचे आ.जयकुमार गोरे म्हणाले, माझ्या मतदारसंघात आमचा संघर्ष भाजपा बरोबर नाही तर आपल्याच मित्र पक्षा सोबत आहे. राज्यात आघाडी करताना काँग्रेस पक्ष जिवंत ठेवुन आघाडी करा. आघाडी धर्म पाळायची आमची एकट्याची जबाबदारी नाही, ती मित्र पक्षाचीही आहे. जिहेकठापूर योजनेसाठी राज्यातील भाजपा सरकारने चार वर्षात फक्त 70 हजार रुपयांचा निधी दिला. राज्यात आमचे आघाडीचे सरकार असताना पाच वर्षात 350 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.आता अनेक जण वावड्या उठवत असले तरी जयकुमारच्या रक्तातच काँग्रेस आहे.सध्याच्या युती शासनाने दुष्काळी भागावर व पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय केला असून विकास कामांना निधी दिला जात नाही. 

आता आघाडीचे सरकार असते तर माण आणि खटाव तालुक्यातील 80 टक्के भाग पाणीदार झाला असता, असेही आ. गोरे म्हणाले. सुत्रसंचालन अकाश पाटील यांनी केले तर आभार एम के भोसले यांनी मानले. सभेस युवा नेते विराज शिंदे, एनएसयु आयचे अध्यक्ष अमीर शेख, रणपिसे, डॉ तांबे, राजू वाघमारे, सचिन सावंत, एम. के. भोसले, डॉ. विवेक देशमुख, डॉ. सुरेश जाधव, अरुण गोरे, साधना गुंडगे, सोनिया गोरे, सुवर्णा पोरे, दादासाहेब काळे, सिध्दार्थ गुंडगे, विजय धट, सुरेश म्हेत्रे, डॉ वसंत मासाळ, नितीन दोशी, अखिल काझी आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभास्थळी येण्याअगोदर शिंगणापूर चौकातून बाजार पटांगणापर्यंत जनसंघर्ष यात्रेच्या रथापुढे काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते सामील झाले होते. यात्रा महात्मा फुले चौकात आल्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या हस्ते भाजपच्या भ्रष्टाचाराची हंडी फोडण्यात आली.

जनसंघर्ष यात्रा म्हसवडमध्ये पोहोचण्यास तब्बल चार तास वेळ झाला, तरीही जमलेली हजारोंची गर्दी जागेवरून हलली नाही. सभास्थळी काँग्रेस कार्यकर्त्यांचे जथेच्या जथ्थे येत होते. सर्वत्र प्रचंड उत्साह दिसून येत होता.