Your Own Digital Platform

वाईच्या पश्‍चिम भागावर धनिकांचे आक्रमण


मेणवली : वाई तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील डोंगर माथा ते धोम-बलकवडी जलाशयाच्या पाण्यापर्यंत पुणे मुंबईसह गुजरातच्या धनिकांनी जणू आक्रमणच केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. धनिकांकडून याठिकाणी जागा खरेदी करून येथील निसर्ग सौदर्याला सिमेंटच्या विळख्यात अडकविले आहे. जणूकाही संपूर्ण पश्‍चिम भागाचा जाज्वल्य इतिहास व संस्कृतीला गिळंकृत करण्याचा विडा या अतिक्रमणधारकांकडून उचलला असून भविष्यात भूमिपुत्रांना कायमचे हद्दपार होण्याची भीती स्थानिक जनतेतून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या डोंगरउतार व जलाशयालगत पूर्ण झालेली व सुरू असलेल्या बांधकामांची सखोलपणे चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सध्या वाईच्या पश्‍चिम भागावर पर्यटकाऐवजी परकीय धनिकांनी पैशाच्या जोरावर धरणासह जमिनीच्या चारी दिशा काबीज केल्या आहेत. पाहावे तिकडे कृषी पर्यटनाच्या गोंडस नावाखाली मोठमोठे रिसॉर्ट, हॉटेल बांधकामे वेगाने सुरु आहेत. मुळचे निसर्गसौंदर्य नष्ट करून येथील जमिनी डोंगर मशिनने दिवसाढवळ्या पोखरली जात आहेत. सगळे धनिक वजनदार असलेने वजन ठेवून महसूल व पाटबंधारे विभागाला मागील दाराने विभागून वसुल देवून बिनबोभाट मनाप्रमाणे उत्खननाचे कामकाज धोम जलाशय परिसरात गतिमान होताना दिसत आहेत.
धोम जलाशय जोर व जांभळी या दोन खोऱ्यात विखुरलेले आहे. 

दुसऱ्याच्या जीवनात आनंद देण्यासाठी धरणाच्या पाण्यात 36 गावांना आपल्या जन्म व कर्मभूमीला जलसमाधी देवून सातारा, कोरेगाव, फलटण व अन्य ठिकाणी विस्थापित व्हावे लागले आहे. नेमका याच संधीसह धरणग्रस्थाच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेवून कवडीमोल दराने दलालांच्या मध्यस्तीने येथील भूमिपुत्रांना भूमिहीन करून धनिक या भागाचे जमीन मालक झाले आहेत. या परिस्थितीला नेमंक कोण जबाबदार कोण? विस्थापितांचे उर्वरित बांधव धरण लाभक्षेत्रातून शिल्लक राहिलेल्या तुटपुंज्या जमीन तुकड्यावर डोंगर कपारीत कसेबसे जीवन जगणाऱ्या स्थानिकाना नियम बाह्य बंगले इमले बांधून संस्कृतीला सुरुंग लावण्याचे काम धनिकांनी सुरू केल्याने या सुरंगाची वात पेटण्याच्या अगोदरच विझवण्यासाठी भूमिपुत्रांनी एकत्र आले पाहिजे, अन्यथा धनिकांच्या लोभापायी पवित्रभूमीतील छत्रपतींच्या इतिहासाचा वारसा पुसला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, हे देखील तितकेच खरे आहे.