गणेशोत्सवात डाॅल्बी वाजणारच नाही- स.पो.नि. उत्तम भापकर


पाटण : हिंदू संस्कृतीमध्ये गणेशोत्सव हा पवित्र सण मानला जातो.हा उत्सव तरूण मंडळानी शांततेत साजरा करत कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, तसेच विसर्जन मिरवणुकीत डाॅल्बीवर बंदीच राहील, गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास मदत करावी असे आवाहन पाटणचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर  पाटण पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या शांतता बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बोलताना श्री.भापकर म्हणाले की,पाटण तालुक्यात गणेशोत्सव सुरळीत पणे पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाटण पोलीस सतर्क आहे. तालुक्यात 265 मंडळांनी नोंदणीकृत केले असून 26 गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक मंडळांनी शक्यतो प्रबोधनात्मक देखावे सादर करावे, धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे देखावे, पोस्टर्स, लावू नयेत, मंडळांनी गणेश मुर्तीसह मंडप, लायटींग, याबाबत विशेष काळजी घ्यावी, तसेच स्वयंसेवक नेमून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावा.

देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या महिला युवतींचे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी  सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंसेवकांनी शक्यतो बॅरिगेटस लावून महिलांची स्वतंत्र रांग करावी.रितसर स्पिकर परवाने घेऊन आवाजाची मर्यादा ठेवावी, मंडळाच्या पाठीमागे कार्यकर्त्यांनी पते जुगार, मद्यपान न करता गणेश मूर्तीचे पावित्र्य राखावे, कार्यकर्त्यांनी वर्गणी सक्तीने वसूल करू नये, अन्यथा तशी तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल,विसर्जन मिरवणुकीत डाॅल्बीवर पूर्णपणे बंदी आहे , उल्लंघन केल्यास कोणतीही हयगय न करता कडक कारवाई करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता शांततेत गणेशोत्सव साजरा करून समाजात कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन शेवटी केले.

यावेळी नगरसेवक सचिन कुंभार म्हणाले की, पाटण मधील सर्व गणेश  मंडळे दरवर्षी शांततेत सार्वजनिक  गणेशोत्सव साजरा करतात, पोलीस प्रशासनाच्या अटी व शतीॅ नुसार गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका पार पाडल्या जातील,समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळाच्या वतीने पोलीस प्रशासनास आवश्यक सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली, यावेळी  महिला दक्षता कमिटीच्या सदस्या, आयेशा सय्यद, विजय थोरवडे, गोरख नारकर, यांच्या सह पाटण परिसरातील  विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष,पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.