Your Own Digital Platform

सत्यजितसिंह पाटणकर यांचा गनिमी ‘षटकार’


पाटण : विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ‘पराभव’ हा शब्द आपल्या शब्दकोशातून बाजूला काढत त्यानंतर झालेल्या निवडणूकात शांत, संयमी व तितक्याच गनिमी काव्याने यश मिळविणार्‍या युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी या टप्प्यातील सहापैकी सहा ग्रामपंचायत ताब्यात घेऊन आगामी विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीसाठी विजयाचा ‘षटकार’ मारला आहे. तालुक्यात, राज्यात, देशात सत्ता नसतानाही प्रतिकूल राजकीय परिस्थितीतही मिळवलेल्या या यशामुळे राष्ट्रवादीचे मनोबल चांगलेच वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

बाजार समिती, नगरपंचायत, जिल्हा बँक, पंचायत समिती, जिल्हा परिषद त्यानंतर झालेल्या सर्वच टप्प्यातील ग्रा.प.निवडणुकात सत्यजितसिंह पाटणकर यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व केले.भपका, जाहिरातबाजी करण्यापेक्षा पदाधिकारी, कार्यकर्ते ते सामान्य मतदार यांच्याशी थेट संपर्क हाच अजेंडा हे या विजयातील प्रमुख वैशिष्ट्य ठरला. यावेळी नहिंबे चिरंबे ग्रा. प. बिनविरोध करताना सत्ता अबाधित ठेवली. पाच ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूका झाल्या त्यात येरफळे, लुगडेवाडी, मेंढची सत्ता टिकवत आ. देसाई गटाच्या खराडवाडी, नानेगाव बुद्रुक येथील सत्ता सहकार्‍यांच्या मदतीने सत्तांतर करून विरोधकांना ‘जोर का झटका धिरेसे’ देण्यात ते यशस्वी झाले.

सत्यजितसिंह यांच्या विजयाचा चढता आलेख हे सार्वत्रिक राजकीय चित्र आहे. विरोधी शासन, तालुक्यातील नवनवीन राजकीय होणारे बदल अशा आव्हानात्मक परिस्थितीत पक्षाला तितक्याच ताकदीने पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे. लवकरच लोकसभा व त्यानंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणुकांचाही रणसंग्राम सुरू होईल. घटक चाचणी, तिमाही, सहामाही ते अगदी पुर्वपरिक्षेतही अनपेक्षित यश मिळविलेल्या सत्यजितसिंह यांचा 2019 च्या महत्वपूर्ण विधानसभा निवडणुकीत खरा कस लागणार आहे.े विजयाची ही यशस्वी घौडदौड ते अशीच कायम ठेवणार का? याकडेच सार्वत्रिक नजरा लागल्या आहेत.