Your Own Digital Platform

साताऱ्यातील राजे-महाराजांना शरद पवारांचा टोला!


सातारा : समाजासाठी राजे पद वापरताना राजांनी खबरदारी घेतली नाही तर बर्‍याच जणांना त्याच्या यातना कारण नसताना सहन कराव्या लागतात, असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील राजे-महाराजांना दिला आहे. सातारा जिल्ह्यात सध्या राजे-महाराजांची यादवी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांचे व विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांचे टोकाचे युद्ध सुरू आहे. गाजलेल्या पत्रकबाजीपासून ते सरकारी विश्रामगृहावर जाण्यापर्यंत लढाई गाजली. मुद्द्यावरची लढाई गुद्द्यावर जाऊन पोहोचली आहे. त्यातच ही लढाई केवळ उदयनराजे व रामराजे यांच्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर उदयनराजेंविरुद्ध आ. शिवेंद्रराजे अशीसुद्धा लढाई आता सुरू आहे. उलट, त्याला टोकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

नुकतेच शरद पवार सातार्‍याच्या दौर्‍यावर असताना राजेशाहीतील हा संघर्ष एखाद्या वादळाप्रमाणे त्यांच्या समोर आला. मात्र, पवारांनी शिताफीने त्यातून मार्ग काढला. आमदारांनी थेट उदयनराजेंविरोधात पवारांकडे कागाळ्या केल्या, तर उदयनराजेंनीही ‘फसवा फसवी केली तर आपल्याला पण कळतं’ असे म्हणत थेट शरद पवारांना इशारा दिला. त्यानंतर लगेचच पवारांनी बारामतीत तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला रामराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह आमदार उपस्थित होते. त्यांनी उदयनराजेंचे किस्से पवारांना सांगितले. त्यानंतर उदयनराजेही पवारांना भेटले. पुढच्या आठवड्यात सर्वांची संयुक्त बैठक लावून तोडगा काढण्याचे ठरले. बारामतीत झालेल्या बैठकीत आमदारांनी उदयनराजेंविरोधात भूमिका घेतली. मात्र, माध्यमांशी याबाबतचे स्पष्टीकरण देताना पवारांनी मात्र सावध पवित्रा घेत उदयनराजेंविरोधात कुणीही बोलले नसल्याची गुगली टाकली. ज्या पवारांनी दोन दिवसांपूर्वी असे विधान केले त्यांनीच मुंबईत एका वृत्त वाहिनीशी बोलताना राजे-महाराजांचा समाचार घेतला.

प्रश्‍न तुम्हाला जाणता राजा म्हणतात ते कसे काय? हे राजेपद तुम्हाला पेलवते का? असा असताना पवारांनी उत्तर मात्र सातार्‍याच्या दिशेने दिले. ते म्हणाले, माझ्या पक्षात राजे बरेच आहेत आणि हल्ली वृत्तपत्रे त्यांची नोंदही सारखी घेत असतात. त्यामुळे समाजासाठी राजांनी हे पद वापरताना सातत्याने खबरदारी घेतली नाही तर बर्‍याच जणांना त्याच्या यातना कारण नसताना सहन कराव्या लागतात आणि हे सर्व माझ्या आजुबाजूच्या सगळ्या सहकारी मित्रांच्या माध्यमातून मी पाहतो आहे, पवारांचे हे विधान म्हणजे सातार्‍यातील राजे मंडळींना विशेषत: खा. उदयनराजेंना दिलेली समज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पवार पुढे म्हणाले की, तुम्ही समाजकारण करत असताना सत्तेत असा अथवा विरोधात ज्या लोकांच्या मदतीने अथवा पाठिंब्याने इथपर्यंत पोहोचला आहात त्यांच्या सुख-दु:खाच्या आणि संकटाच्या काळात तुम्ही तातडीने जाणे हे तुमचे कर्तव्य आहे. असे जे करतात त्याला लोक जाणता म्हणत असतील. असे मला वाटते. मी उभ्या आयुष्यात हे केले आहे. एकंदर पवारांनी सुरू असलेल्या घडामोडींवर मार्मिक भाष्य करत राजे पद कसे संभाळावे? असा सल्लाच राजे मंडळींना दिला आहे.