Your Own Digital Platform

अजिंक्यतारा कारखाना किफायतशीर दर देणार


सातारा: अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी पिकवलेल्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. गेल्या काही वर्षांपासून आपला कारखाना पूर्णपणे स्वयंपूर्ण झाला असून हा कारखाना गाळपासाठी येणार्‍या उसाला किफायतशीर दर देण्याची परंपरा कायम राखण्यास कटिबध्द आहे, अशी ग्वाही कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर स्व. आमदार श्रीमंत अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत होते.

आ. शिवेंद्रराजे यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आपणा सर्वांच्या सहकार्याने कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम असून कारखान्याचे नेटवर्थ रूपये 4138.40 लक्षचे आहे. गतवर्षीची तुलना करता यामध्ये रूपये 73.77 लक्षने वाढ झाली आहे. कारखान्याचे उत्पन्न वाढण्याकरता डिस्टीलरीचे आधुनिकीकरण करून इथेनॉल प्लँटची क्षमता 10,000 लिटर्स वरून 30,000 केली आहे. येत्या सन 2018-19 चे गाळप हंगामात 30.00 लक्ष इथेनॉल उत्पादन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे ते म्हणाले.

सन 2018-19 चा गाळप हंगाम हा कसोटीचा असून कारखान्याकडे नोंद केलेल्या सर्व ऊसाचे गाळप करावयाचे असून या गाळप हंगामासाठी सभासद, बिगर सभासदांनी कारखान्याकडे नोंदलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी पुरवून गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे यांनी याप्रसंगी केले.

कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी सभेची नोटीस व अहवाल वाचन केले. अजेंड्यावरील सर्व विषयांना सभासदांनी सर्वांनुमते मंजुरी दिली. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 2500 मे. टनावरून प्रतिदिनी 4500 मे.टन करण्यासाठी संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीला सभेने मान्यता दिली.

कारखान्याचे उपाध्यक्ष विश्‍वास शेडगे यांनी स्वागत केले. संचालक नामदेव सावंत यांनी आभार मानले. सभेस जि. प. महिला व बाल कल्याण सभापती सौ. वनिता गोरे, शिवाजीराव चव्हाण, चंद्रकांत जाधव, किरण साबळे, सतीश चव्हाण, राजू भोसले, सभापती मिलींद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत आदी उपस्थित होते.