कासकडे वळू लागलीत पर्यटकांची पावले


सातारा : कास पठाराला समृध्द जैवविविधतेचा वारसा लाभला आहे. या पठारावरील फुलांच्या हंगामास सुरुवात झाली असून गालीचे बहरण्यास अजून अवधी असला तरी या पठाराने आपले ‘रंग’ दाखवायला सुरूवात केली आहे. शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची पावले या पठाराकडे वळल्याचे दिसून आले. डोंगररांगांनी हिरवा शालू पांघरला असून ‘कास’वर विविध रंगीफुले बहरु लागली आहेत. सध्या तेरडा, चवर, गेंध, सितेची आस्वे, रान महुरी, अबोलीया यासह इतर फुलांनी पठारावर रंग बहरु लागले आहेत. 

हे पठार पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. फुलांच्या वाढीसाठी पोषक वातावरण होत असल्याने 35 हून अधिक फुले बहरु लागली आहेत. असेच वातावरण राहिल्यास आठ दिवसात फुलांचे गालीचे पाहावयास मिळणार आहेत. पठारावर फुले बहरण्यास अजून अवधी असला तरी नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक भेटी देवू लागले आहेत. सुमारे दोन हजारहून अधिक पर्यटकांनी आतापर्यंत कास पठारास भेट दिली आहे. शनिवारीही अनेक पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. आज रविवार असल्याने ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या अबोलीया, रान महुरी, टुथ ब्रश, दिप कांडी, चवर, पंद, कापरु, तेरडा, गेंध, सितेचे आस्व, पांढर्‍या, लाल, जांभळ्या रंगाच्या छटांनी पठार बहरले आहे. सातारेन्सीस, वाईतुरा, अबनिरीया ग्रन्डी फ्लोरीफॉरमीस, अबनारिया रारी फ्लोरा, पांढरा सापकांदा (नागफनी), नरकी सापकांदा, पांचगणी आम्री, बिबळ्या आर्किड, शिलाइंडिका अशी विविध प्रकारची फुले बहरण्यास प्रारंभ झाला आहे. पठाराचे खरे सौंदर्य बहरण्यास अजून काही दिवसांचा अवधी लागणार आहे. सध्या थंड व अल्हाददायक वातावरण, धुक्याची दुलई व खट्याळ वारा याचा मनमुराद आनंद पठारावर मिळत आहे.

No comments

Powered by Blogger.