वाढेफाटा ते खिंडवाडी रस्ता ठरतोय यमदूत


खेड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाचा सातत्याने होणारा आरोप व ठिकठिकाणी राहिलेल्या सहापदरी कामातील त्रुटींमुळे वाढे फाटा ते खिंडवाडी या सुमारे 5 ते 6 कि. मी. मार्गावरील धोकादायक स्पॉट वाहन चालकांसाठी यमदूत ठरले आहेत तर महामार्गावरून सेवा रस्त्याकडे वळवलेल्या वाहतुकीने वाहन चालकांची त्रेधातिरपीट उडत आहे. नागरिकांनी वळण मार्गावर सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी करूनही महामार्ग प्राधिकरणाने बोटचेपे धोरण स्वीकारल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मोठा अपघात झाल्यानंतरच प्राधिकरणाचे अधिकारी जागे होणार का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

पुणे-बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा, खेड नाका, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज चौक, अजंठा चौक, खिंडवाडी परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे काही दिवसांपूर्वी मुजवण्याचे काम करण्यात आले तरीदेखील महामार्गावरून सेवा रस्त्याला जोडलेल्या मार्गावरील जीवघेणे खड्डे अद्यापही जैसे थे असल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. वाढे फाट्यावरील उड्डाण पुलावरून नुकतीच वाहतूक सुरू करण्यात आली. अनेक महिने चाललेल्या पुलावर खड्डे कमी प्रमाणात असले तरी पुलाखालील लोणंद-सातारा ते पोवईनाक्याकडे जाणार्‍या मार्गावरील खड्डयांची मालिका अपघाताला निमंत्रण ठरली आहे. येथील महामार्गाला जोडणार्‍या रस्त्याला पुण्याकडे जाणार्‍या वेण्णा नदीच्या पुलावर आराखड्याप्रमाणे वाढीव ‘ब्रिज’ची आवश्यकता होती. परंतू प्राधिकरणाने येथील ब्रिजचे रूंदीकरण केले नाही. त्यामुळे महामार्गावरील वाहनांची वेगमर्यादा नियंत्रित न झाल्यास धोकादायक स्थिती निर्माण होवू शकते. महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जाताना खेड गावाला जोडणार्‍या ठिकाणी बांधलेला भुयारी मार्ग अरूंद आहे तर पुढे तीव्र उतार असून याच ठिकाणी सेवा रस्त्यावरून महामार्गाला जोडणारे वळण अपघात प्रवण क्षेत्र झाले आहे. 

अशीच स्थिती बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून जाणार्‍या उड्डान पुलानजिक आहे. त्याठिकाणी सर्व्हिस रस्त्यावरून जोडणार्‍या मार्गावर कोणतीच सिग्नल यंत्रणा नसल्याने जीवघेणी स्थिती निर्माण होत आहे. या मार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डान पुलाखालील खड्डे तर वाहतुकीला धोकादायक झाले असून खड्डे दाखवा व बक्षीस मिळवा, अशी उपरोधिक टिका वाहन चालकांकडून केली जात आहे. अजंठा चौकातील उड्डान पुलावरून शिवराज चौकाकडे जाताना तीव्र उताराचा रस्ता असल्याने तेथून वेगमर्यादा नियंत्रित न झाल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शिवराज चौकातून सातारा शहराकडे जाणार्‍या सर्व्हिस रस्त्यावर वाहन वळवताना एस.टी.चा थांबा विरूद्ध दिशेेेने असल्याने महामार्गावर एस.टी.थांबवणे धोक्याचे झाले आहे. खिंडवाडीला जाण्यासाठी बांधलेल्या उड्डान पुलानजिकच्या रस्त्यावर तीव्र उतार असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून अवजड वाहने उलटत आहेत.

No comments

Powered by Blogger.