‘पुस्तकाचे गाव’ उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवा : विनोद तावडे


सातारा : ‘शिक्षणाची वारी’ उपक्रम व्यापकपणे राबवल्यास गुणवत्तावाढीसाठी त्याचा निश्‍चितच उपयोग होऊ शकतो. शिक्षण विभागाने त्यासाठी आणखी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर पुस्तकांचे गाव भिलार हे जसे सांस्कृतिक केंद्र झाले आहे. तसेच केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यासाठी गावकर्‍यांच्या तसेच लोकप्रतिनिधींच्या मदतीने कृतिशील शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण ना. विनोद तावडे यांनी केले.

राज्याच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम सातार्‍यात जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम हॉलमध्ये बुधवारी पार पडला. या कार्यक्रमास पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सव्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मोहनराव कदम, शिक्षण विभागाच्या अप्पर सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, अभिनेते आदेश बांदेकर, भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, धनंजय जांभळे प्रमुख उपस्थित होते.

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात मान्यवरांच्या भाषणांचा समावेश न करता ना. विनोद तावडे यांनी आदर्श शिक्षकांशी संवाद साधणे पसंत केले. आदर्श शिक्षकांशी संवाद साधून ना. तावडे यांनी शिक्षकांच्या सुचनांवर चर्चा केली. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना ना. तावडे यांनी उत्‍तरे दिले. दिलखुलास गप्पांचा हा कार्यक्रम सुमारे अर्धा तास रंगला.

शिक्षणाच्या वारीतील शिक्षकांचा सहभाग वाढवावा. त्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावा. जिल्हापातळीवर हा उपक्रम सुरु करावा, अशी मागणी शिक्षकांनी केली. त्यावर ना. विनोद तावडे म्हणाले, ही चांगली सुचना आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभाग प्रयत्न करेल.

आदर्श शिक्षक पुरस्कार अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केल्याने प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिक्षकाला न्याय मिळाला. अनुदानित शाळा वाढवल्यास त्याचा आदिवासी शाळांना लाभ होईल, अशी सूचना एका शिक्षकाने केली. त्यावर बोलताना ना. विनोद तावडे म्हणाले, आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आता मुख्याध्यापकाकडे वशिला लावण्याची गरज नाही. आदिवासी मुलांना मोफत शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी विनानुदानित शाळा अनुदानित करायचा प्रश्‍नच येत नाही. काही एनजीओ तसेच शिक्षकांनी सहकार्य केल्यास राज्यातील बर्‍याच शाळांना इंटरनेट उपलब्ध होवू शकेल, असे ना. तावडे यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षकांना शाळाबाह्य कामे लावणे बंद केले तर शाळांची गुणवत्‍ता वाढेल, यावर शासनाचा काय विचार आहे? असे शिक्षकांनी विचारले असता ना. विनोद तावडे म्हणाले, शाळाबाह्य कामे करावी लागत असल्याने त्याचा गुणवत्‍तेवर परिणाम होतोय हे खरं आहे. मात्र, ज्या शिक्षकांना शाळेत कामे नसतात त्यांनी शाळांच्या गुणवत्‍तेकडं लक्ष द्यायला हवं, असे सांगितले.

कमी पटसंख्येमुळे बंद पडणार्‍या शाळा सुरु कराव्यात. अशा शाळांवर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्‍त शिक्षकांची रोटेशनने बदली करावी, अशी सुचना एका शिक्षकाने मांडली असता ना. विनोद तावडे म्हणाले, या सुचनेचा विचार करुन नक्‍की निर्णय घेतला जाईल.

सातारा जिल्ह्यातील भिलार हे पुस्तकांचं गाव मन मोहून टाकणारं आहे. पण याठिकाणी शैक्षणिक सहलींसाठी माफक किंमतीत राहण्याची सोय असायला हवी. शैक्षणिक सहलींना परवानगी मिळत नसल्याने त्यावर शासन निर्णय काढावा, अशी सुचना महिला शिक्षिकेने केली असता ना. विनोद तावडे म्हणाले, पुस्तकांचे गाव भिलारमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. अन्य सोयी-सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जातील. मात्र, भिलारमध्ये मुक्‍काम करुन महाबळेश्‍वर व अन्य परिसरात सहलींचे आयोजन असे व्हायला नको. धोक्याच्या ठिकाणी सहली काढू नयेत. भिलार हे सुरक्षित आहे. त्याठिकाणी कोणताही धोका नाही. त्यामुळे शासन निर्णयाची आवश्यकता नाही, असे ना. तावडे यांनी सांगितले.

भिलारसारखे पुस्तकांचे गाव राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असायला हवे. त्यासाठी अनुदान मिळाले तर शिक्षक गावकर्‍यांच्या सहभागाने असा उपक्रम राबवतील. शिक्षण विभागाने सहकार्य करावे, अशी सूचना एका शिक्षकाने केल्यावर ना. विनोद तावडे म्हणाले, सुचना चांगली आहे. त्यासाठी आमदार-खासदारांचीही मदत घेता येवू शकेल. गावागावांत असे उपक्रम राबवायला हवेत, असे सांगितले. गळक्या शाळांची दुरुस्ती, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्रक्रियाही ऑनलाईन करावी, अशी मागणी शिक्षकांनी यावेळी केली.

या संवाद चर्चेनंतर शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात आले. त्यानंतर सिने अभिनेता भरत जाधव व आदेश बांदेकर यांची मुलाखत पुष्कर श्रोत्री यांनी घेतली. तिघांनीही शाळा व त्यांच्या शालेय जीवनातील शिक्षकांसंबंधीच्या आठवणी सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर उर्वरित आदर्श शिक्षक पुरस्कार (प्राथमिक व माध्यमिक विभाग), आदिवासी प्राथमिक शिक्षक, कला, क्रीडा, दिव्यांग, स्काऊट, गाईड शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये राज्यातील 108 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षकांनी रावबलेल्या उपक्रमांची ‘परिचय पुस्तिका’ तसेच ‘प्रायोगिक शिक्षा- गांधीजी की नई तालीम’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

No comments

Powered by Blogger.